खरप येथील दुहेरी हत्याकांड; सात आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:54 AM2020-05-27T10:54:55+5:302020-05-27T10:55:02+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्याकांडातील सात आरोपींना मंगळवारी अटक केली.
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खरप येथे वेल्डिंग वर्कशॉपचा व्यवसाय करणाऱ्या बाप- लेकाची याच परिसरातील रहिवासी सात आरोपींनी निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्याकांडातील सात आरोपींना मंगळवारी अटक केली. या सातही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. विजय क्षीरसागर तसेच सनातन क्षीरसागर अशी मृतकांची नावे असून, जागेचा वाद तसेच पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे.
खरप येथील रहिवासी तसेच वेल्डिंगचा व्यवसाय करणारे विजय क्षीरसागर आणि सनातन क्षीरसागर याच परिसरातील एका चौकात सोमवारी रात्री उभे असताना त्यांच्यावर खरप येथील रहिवासी छोट्या उर्फ धम्मपाल नागसेन इंगळे, जयसेन नागसेन इंगळे, आकाश बिंबिसर इंगळे, आदेश देवानंद इंगळे, सतीश देवानंद इंगळे, जयपाल उर्फ लखन इंगळे, निल इंगळे या सात आरोपींनी लोखंडी पाइप, काठ्या तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हे हत्याकांड घडल्यानंतर परिसरात शांतता असल्याने या दोघांचेही मृतदेह बराच वेळ रस्त्यावर पडून होते. स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना हत्याकांडाची माहिती मिळाली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच विजय क्षीरसागर आणि सनातन क्षीरसागर यांचे मृतदेह ताब्यात घेऊन तातडीने उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. त्यानंतर या हत्याकांडाचा तपास करतानाच सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. या आरोपींकडून स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या पथकाने पाइप तसेच काही शस्त्र जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा सदर सात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.
स्थानिक गुन्हे शाखेने केले आरोपी अटक
खरब येथे पूर्ववैमनस्यातून बापलेकाचे दुहेरी हत्याकांड झाल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन सोमवार आणि मंगळवारी हत्याकांडातील सात आरोपींना अटक केली. या आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.