अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचारात दुपटीने वाढ; १०० मुलींचे अपहरण, ५३ जणी सापडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:45 AM2020-08-28T01:45:39+5:302020-08-28T01:45:54+5:30
लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात महिलांवरील अत्याचार, चोरी, घरफोडी, हत्या, दारोडा, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले होते.
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात रोडावलेल्या गुन्हेगारीने अनलॉकच्या काळात डोके वर काढले. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक आत्याचाराच्या घटनेत दुपटीने वाढ झाली आहे. तर १०० मुलींचे अपहरण झाले असून, त्यापैकी अवघ्या ५३ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे
लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात महिलांवरील अत्याचार, चोरी, घरफोडी, हत्या, दारोडा, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले होते. लॉकडाऊनचे सुरुवातीचे काही दिवस सोडले तर, मुख्यत्वेकरून एप्रिल-मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. शहरात दिवसाला दाखल होणाऱ्या बलात्काराच्या सरासरी तीन गुन्ह्यांचे प्रमाण घटून दर दोन दिवसात एका गुन्ह्यावर आले. यात जून आणि जुलैमध्ये चोरी, घरफोडी, वाहनचोरी बरोबरच अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यात महिला अत्याचाराच्या ४७७ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. जूनमध्ये २५ तर जुलैमध्ये ३३ अल्पवयीन मुली विकृत वासनेच्या बळी ठरल्या. तर महिलांवरील बलात्काराचे अनुक्रमे २१ आणि १५ गुन्हे नोंद आहेत. यातच दोन महिन्यात १०० अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून त्यापैकी अवघ्या ५३ मुलींचा शोध घेण्यात आला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात हाच आकडा ६२ असून त्यापैकी २५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. तसेच विनयभंगाचे जूनमध्ये १०३ तर जुलैमध्ये ८४ गुन्हे दाखल झाले आहेत. यात एप्रिल महिन्यात अवघ्या ३६ तर मे महिन्यात ५६ गुन्ह्यांची नोंद झाली होती.