आदर्श घालून दिलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 10:08 PM2021-12-17T22:08:03+5:302021-12-17T22:08:35+5:30
Bribe Case : मेडिकल दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार केली. पोलीस निरीक्षक अमन आपल्याकडे लाच मागत असून आपला काहीही दोष नसताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं त्याने तक्रारीत सांगितलं.
जयपूर - हुंडा न घेता लग्न केल्याने काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेलापोलीस निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये नार्कोटिक्स विभागात पोलीस निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या अमन नावाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली. एका मेडिकल दुकानदाराकडे त्यांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई न करण्याच्या बदल्यात ही रक्कम द्यावी, अशी मागणी या लाचखोर पोलिसाने दुकानदाराकडे केली होती. त्यानंतर २ लाखांवर मांडवली झाली होती आणि ही लाच स्विकारण्याचा एक दिवसही ठरला होता.
मेडिकल दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार केली. पोलीस निरीक्षक अमन आपल्याकडे लाच मागत असून आपला काहीही दोष नसताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं त्याने तक्रारीत सांगितलं. त्यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून पोलीस निरीक्षकास बेड्या ठोकल्या.
दोन वर्षांपूर्वी लग्नात हुंडा नाकारून याच पोलीस अधिकाऱ्याने आदर्श घालून दिला होता. मात्र आता लाच घेताना रंगेहाथ पकडलं गेल्यामुळं त्याने कमावलेली इज्जत गमावली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.