डॉ. दाभोळे दाम्पत्याची ६६ लाखांची फसवणूक, गुंगीचे औषध देऊन लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:45 AM2020-09-19T01:45:02+5:302020-09-19T01:45:23+5:30
पैसे बुडविण्याच्या हेतूनेच खोटी फिर्याद दाभोळे दाम्पत्याकडून मला रुग्णालयाच्या बिलापोटी २,३३,५०३ रुपये येणे आहेत. हे पैसे बुडविण्याच्या हेतूनेच माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दिली आहे, असे म्हमाणे यांनी सांगितले.
कोल्हापूर : स्वत: चहा करून, त्यात गुंगीचे औषध घालून व एकदा दूध-भाकरीमधून गुंगीचा पदार्थ घालून घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले ६६ लाख रुपये अनिल सुभाष म्हमाणे (रा. ८७३, सोनटक्के तालीम, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) याने चोरून नेल्याची तक्रार महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. ज. रा. दाभोळे यांच्या पत्नी रेखा दाभोळे (वय ७५) यांनी शाहूपुरी पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा दिली.
फसवणुकीचा प्रकार २० जूनपासून ४ सप्टेंबर २०२० पर्यंत घडला आहे. पोलिसांनी सांगितले की, आंबेडकर चळवळीतील पुस्तके छपाईच्या माध्यमातून म्हमाने याने दाभोळे यांच्याशी ओळख वाढवली. दाभोळे यांची दोन्ही मुली अमेरिकेत असल्याने हे दोघेच फ्लॅटमध्ये राहतात. त्यांनी निवृत्तीनंतरची रक्कम विविध बँकांच्या खात्यांत गुंतवली होती. म्हमाणे याने दाभोळे यांना आर्थिक आणीबाणीची बातमी वाचून दाखवली आणि बॅँकेतील पैसे काढून घरी सुरक्षित ठेवू, असे सुचविले. त्यानुसार रेखा दाभोळे यांना घेऊन जाऊन बँकांतील ही रक्कम त्यांनी काढली व घरी आणून ठेवली. त्यानंतर म्हमाणे त्यांच्या घरी दोन वेळा गेला. एकदा स्वत:च चहा करून देतो, असे सांगून त्यामध्ये व दुसऱ्या वेळी दूध-भाकरीमधून गुंगीचे औषध घालून दिले. औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर घरात येऊन पैशाची पिशवी चोरून नेली.
पैसे बुडविण्याच्या हेतूनेच खोटी फिर्याद दाभोळे दाम्पत्याकडून मला रुग्णालयाच्या बिलापोटी २,३३,५०३ रुपये येणे आहेत. हे पैसे बुडविण्याच्या हेतूनेच माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दिली आहे, असे म्हमाणे यांनी सांगितले.