डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: डॉ. वीरेंद्रसिंह तावडे,विक्रम भावे यांचे जामीन अर्ज फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 03:31 PM2020-09-17T15:31:29+5:302020-09-17T15:32:02+5:30
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टर माईंड आहे, असा दावा सीबीआयने केला आहे
पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ़ वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावले. यापूर्वी डॉ़ तावडे याने तिसऱ्यांदा तर, भावे याने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला होता.
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टर माईंड आहे, असा दावा सीबीआयने केला आहे. विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपात स्पष्ट केले आहे.
डॉ. तावडे आणि भावे यांच्या जामीनावर विशेष न्यायालयात सुनावणी झाली. डॉ. तावडे हा कॉ. पानसरे हत्या प्रकरणात आरोपी आहे. त्याची भूमिका एका साक्षीदाराने विशद केली आहे. तो या गुन्ह्यातील मास्टर माईंड आहे तर भावे याचा जामीन यापूर्वी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अर्ज करणे गरजेचे आहे.जामिनावर असताना त्याने गुन्हा केला आहे. प्रथमदर्शनी त्याच्याविरोधात पुरावे असून भावेने याने घटनास्थळी रेकी केली होती, असे इतर आरोपींनी कबुल केले आहे. त्यामुळे दोघांचे जामीन अर्ज फेटाळावेत, अशी विनंती सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी आपल्या युक्तीवादात केली.
डॉ़ तावडे यांना कॉ़ पानसरे प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्या गुन्ह्यात तावडे मास्टरमार्इंड नाही, असे त्या आदेशात नमूद केले आहे़ शरद कळसकर याचा जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही़ या गुन्ह्यात त्यांचा सहभाग दिसून येत नाही, असा युक्तिवाद डॉ. तावडे व भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी केला आहे.
वडिलांना भेटायला परवानगी
आपले वडिल वृद्ध असून सध्या ते आजारी आहेत. त्यामुळे त्यांना भेटायची परवानगी मिळावी, असा अर्ज डॉ. तावडे याने न्यायालयाला केला होता. त्यानुसार न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत पोलिसांच्या उपस्थितीत वडिलांना भेटण्यासाठी डॉ. तावडे याला परवानगी दिली आहे.