डाॅ. शीतल आमटेंच्या मृत्यूस कारणीभूत औषध जप्त; गोळ्या आणि इंजेक्शनही आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 03:55 AM2020-12-04T03:55:53+5:302020-12-04T08:06:32+5:30
विसेरातील नमुन्यांसोबत तपासणी करणार
राजेश भोजेकर
चंद्रपूर : डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूस कारणीभूत औषधीसह न वापरलेले इंजेक्शन व गोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहे. जप्त केलेले औषध व डाॅ. शीतल यांच्या विसेरातील नमुने जुळतात वा नाही हे तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठविले आहे. डाॅ. शीतल यांची आत्महत्याच असावी, या निष्कर्षापर्यंत तपास पोहचला असला तरी यासाठी अहवालाकडे पोलिसांचे लक्ष लागून आहे, अशी माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’ला दिली.
या शिवाय पोलिसांना काही महत्त्वपूर्ण धागेदोरे गवसले आहेत. त्याची पडताळणी केल्यानंतर पोलीस डाॅ. शीतल मृत्यूबाबत खुलासा करतील, असे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. बुधवारी पोलिसांनी डाॅ. शीतल यांच्या मृत्यूदरम्यान तिच्या संपर्कात आलेले पती गौतम करजगी, सासू सुहासिनी करजगी व सासरे शिरीष करजगी यांच्यासह दोन नोकरांचे जबाब नोंदवले आहेत. यातून पोलिसांनी एकूणच घटनाक्रम समजून घेतला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांना डाॅ. शीतल यांच्या खोलीत एक औषध आढळले. हे औषध गुंगीचे असावे, अशी शक्यताही पोलीस सूत्राने वर्तविली आहे. हे औषध डाॅ. शीतलच्या विसेराच्या नमुन्याशी जुळते का, किती मात्रा शरीरात गेल्यास मृत्यू होऊ शकतो, किती वेळात मृत्यू होतो. याचाही शोध पोलीस घेत आहे. सुमारे २५ ते ३० गोळ्याही आढळल्या आहेत.
आनंदवनचा निर्णय करण्याची ही वेळ नाही - पल्लवी आमटे
जे घडले ते फार दुर्दैवी आहे. आमटे कुटुंबीयांना यातून सावरायला वेळ लागेल. शीतल अतिशय बुद्धिमान व गुणवत्तादायी होती. तिने जे काही स्वप्न पाहिले. तिची पुढील दिशा जी काही होती. ते पूर्ण करण्यासाठी आमटे कुटुंबीय कटिबद्ध आहेत. डाॅ. शीतलच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर सत्य पुढे येईलच. डाॅ. शीतलच्या मृत्यूने आमटे परिवाराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यातून सावरायला वेळ लागेल. आजवर समाजाने आनंदवनला जे सहकार्य केले. तसेच सहकार्य यापुढेही मिळतील. - पल्लवी आमटे
मोबाइलमध्ये सुसाईड नोट असण्याची शक्यता
डाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली असेल तर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असती. परंतु आतापर्यंतच्या तपासात ती कुठेही आढळली नाही. जप्त केलेल्या मोबाईल, टॅब वा लॅपटाॅपमध्ये सुसाईड नोट असण्याची दाट शक्यता आहे. यातूनच उलगडा होईल.
डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूबाबतचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आत्महत्या असावी, असे एकूणच तपासावरून दिसून येत आहे. परंतु फाॅरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ते स्पष्ट होईल. - अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.