Crime News: हनी ट्रॅपमध्ये अडकला डीआरडीओचा इंजिनिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 06:55 IST2022-06-19T06:55:26+5:302022-06-19T06:55:58+5:30
Crime News: एका पाकिस्तानी महिला हेरासोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) लॅबमधील एका इंजिनिअरला अटक केली आहे.

Crime News: हनी ट्रॅपमध्ये अडकला डीआरडीओचा इंजिनिअर
नवी दिल्ली : एका पाकिस्तानी महिला हेरासोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) लॅबमधील एका इंजिनिअरला अटक केली आहे. देशाच्या क्षेपणास्त्र विकासाबाबतची गोपनीय माहिती त्याने या महिलेला दिली असा त्याच्यावर आरोप आहे.
या महिलेने ब्रिटनच्या डिफेन्स जर्नलची पत्रकार असल्याचे सांगत ही माहिती मिळविली. यासंदर्भात तेलंगणा पोलिसांनी सांगितले की, २९ वर्षांचा आरोपी दुक्का मल्लिकार्जुन रेड्डी हा विशाखापट्टणमचा रहिवासी आहे. डीआरडीओच्या बालापूर येथील रिसर्च सेंटरमध्ये तो काम करतो. राचाकोंडा पोलीस आणि बालापूर पोलिसांनी त्याला मीरपेठमधून त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांना त्याच्याकडे दोन मोबाइल फोन, एक सिम कार्ड आणि एक लॅपटॉप मिळाला आहे. दोन वर्षे एका खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर रेड्डी याने २०२० मध्ये डीआरडीओच्या लॅबमध्ये कंत्राटी पद्धतीवर नोकरी सुरू केली. त्याने आपल्या फेसबुकवर प्रोफाइलमध्ये डीआरडीओसाठी काम करत असल्याचा उल्लेख केला होता. नताशा राव नावाच्या महिलेने त्याला संपर्क केला. ती नताशा राव यासह सिमरन चोपडा आणि ओमिशा अद्दी अशा नावांचाही उपयोग करते. या काळात त्याने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाशी संबंधित फोटो आणि दस्तऐवज फेसबुकच्या माध्यमातून या महिलेसोबत शेअर केले.