परदेशात नोकरीचे स्वप्न दाखवत खाते रिकामे, 4 जणांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:23 PM2022-12-01T14:23:10+5:302022-12-01T14:24:37+5:30
आरोपींकडे लाखो भारतीयांचा डाटा, ४ परदेशी नागरिकांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमेरिका दूतावास कार्यालयात नोकरीला असल्याचे सांगून भारतीय तरुण, तरुणींना परदेशात नोकरीचे स्वप्न दाखवून गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सायबर पोलिसांनी झांबिया, युगांडा, नामिबिया आणि घाना देशांतील चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींकडे दोन लाख ईमेल आयडी, एक लाख चार हजार वेगवेगळ्या भारतीय व्यक्तीचे मोबाइल क्रमांक सापडले असून या सर्वांची अमेरिका आणि कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीची त्यांची योजना होती. मात्र, त्यापूर्वीच सायबर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे.
सायबर विभागाचे पोलिस उपआयुक्त डॉ. बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रीनवेल एमधलोवू, डोरकुस नकाबुका, सेसिलिया न्विनशेनी आणि तेसीन ऊर्फ कोफी ओंकोर डॉन अशी अटक आरोपींची नावे आहेत. ५ एप्रिल ते १ जुलै दरम्यान तक्रारदार यांची डेव्हिड नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने अमेरिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एकूण २६ लाख ३७ हजार ४७३ रुपये भरण्यास भाग पाडले. खाते रिकामे झाले तरी नोकरी न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
पुढे, तांत्रिक तपास करून पुण्यातून या चौकडीला अटक करण्यात आली. आरोपींच्या पेनड्राइव्हमध्ये अमेरिका आणि कॅनडा दूतावास कार्यालयाचे बनावट ऑफर लेटर, बनावट नियुक्तिपत्र, अर्जाच्या पत्राचे नमुने, ईमेल पाठविण्यासाठी तयार केलेले ईमेल आयडी, संदेश, चॅटिंगच्या वर्ड फाइल, नोट पॅड फाइल्स, पीडीएफ ईमेल्स सापडल्या आहेत. तसेच दोन लाख ईमेल आयडी, एक लाख चार हजार वेगवेगळ्या भारतीय व्यक्तीचे मोबाइल क्रमाक सापडले.
या सर्वांची अमेरिका आणि कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून टार्गेटवर असल्याचे तपासात समोर आले. चारही आरोपीना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले
आहे.