डीआरआयची कारवाई : ३.०७ कोटींचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:20 AM2020-07-16T00:20:43+5:302020-07-16T00:22:53+5:30
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), नागपूर विभागाच्या शाखेने दोन कारवाईत सहा लोकांना अटक करून ३ कोटी ७ लाख ५ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. यापैकी एका कारवाईत उत्तर प्रदेशच्या सीमेवर आणि दुसरी कारवाई मौदा टोल नाका, माथनी, भंडारा रोड येथे करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), नागपूर विभागाच्या शाखेने दोन कारवाईत सहा लोकांना अटक करून ३ कोटी ७ लाख ५ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. यापैकी एका कारवाईत उत्तर प्रदेशच्या सीमेवर आणि दुसरी कारवाई मौदा टोल नाका, माथनी, भंडारा रोड येथे करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, डीआरआय, नागपूर विभागाच्या शाखेने पहिली कारवाई मौदा टोल नाक्याजवळ माथनी, भंडारा रोड येथे केली. कारवाईत ६३७.०२० किलो गांजा (किंमत ९५ लाख ५५ हजार ३०० रुपये) जप्त करून तीन लोकांना अटक केली. गांजा ट्रकच्या कार्गो भागात लपवून ठेवला होता. गोपनीय माहितीच्या आधारावर डीआरआयच्या चमूने १४ जुलैला रात्री २.३० वाजता गांजा तस्करांची कार क्रमांक एमएच-१४, सीसी-१८१७ मौदा टोल नाक्याजवळ, माथनी येथे अडवली. कारला थांबवून लोकांची विचारपूस केल्यानंतर ट्रक क्रमांक एमएच-१६, एई-५७४५ मधून गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचे सांगितले. लगेचच ट्रकचा शोध घेण्यात आला. हा ट्रक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, वाठोडा, पारडी, भंडारा रोड येथे आढळला. ट्रकमधून ६३७ किलो गांजा (किंमत ९५ लाख ५५ हजार ३०० रुपये) जप्त करून तीन लोकांना अटक केली. या प्रकरणी तपास सुरू आहे.
बसमधून १४१० किलो गांजा जप्त
यापूर्वी डीआरआय, नागपूर विभागाच्या शाखेने ११ जुलैला उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशच्या सीमेवर एका बसचा सहा तास पाठलाग करून बसमधून १४१० किलो गांजा (किंमत २ कोटी ११ लाख ५० हजार रुपये) जप्त केला. या प्रकरणातील आरोपी यात्रेकरूच्या वेशभूषेत होते. यामध्ये मुलगा व महिलेचा समावेश आहे. तिन्ही लोकांना ताब्यात घेऊन डीआरआय पुढील चौकशी करीत आहे.