DRI ने पकडले १०१ किलो सोने, मुंबई, पुणे, पाटणा येथे कारवाई; ७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:18 AM2023-02-22T06:18:40+5:302023-02-22T06:19:19+5:30
दुसऱ्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी पुणे येथे कारवाई केली. हैदराबाद येथून पुणे मार्गे मुंबईत येणाऱ्या एका बसमध्ये २ सुदानी नागरिकांनी आपल्या हँडबॅगमध्ये साडेपाच किलो सोन्याची पेस्ट लपवली होती.
मुंबई - चालू वर्षातील सोन्याच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) उद्ध्वस्त केले असून या कारवाईदरम्यान तब्बल १०१ किलो सोने, ७४ लाख रुपये मूल्याचे परकीय चलन आणि ६३ लाख रुपयांचे भारतीय चलन अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. तस्करी सुलभतेने करता यावी, यासाठी या सोन्याची पेस्ट करण्यात आली होती. याप्रकरणी सात सुदानी नागरिकांना तर तीन भारतीय नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. याकरिता ‘ऑपरेशन गोल्डन डॉन’ हे विशेष अभियान राबविण्यात आले होते. या सर्व सोन्याची किंमत ५१ कोटी रुपये इतकी आहे.
डीआरआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-नेपाळ सीमेवरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. हे सोने प्रामुख्याने मुंबई व पुणे येथे असल्याचीही माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून सापळा रचला होता. मुंबई, पुणे, पाटणा अशा तीन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून या तीनही ठिकाणाहून हे सोने मुंबईत आणण्यात येत होते. यातील पहिली कारवाई पाटणा येथे झाली. दोन सुदानी नागरिक व त्यांना साहाय्य करणारा भारतीय नागरिक मुंबईला येणाऱ्या रेल्वेमध्ये बसले. यापैकी सुदानी नागरिकांच्या जॅकेटमध्ये ४० पाकिटांतून ३७ किलो सोन्याची पेस्ट लपविली होती.
दुसऱ्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी पुणे येथे कारवाई केली. हैदराबाद येथून पुणे मार्गे मुंबईत येणाऱ्या एका बसमध्ये २ सुदानी नागरिकांनी आपल्या हँडबॅगमध्ये साडेपाच किलो सोन्याची पेस्ट लपवली होती. त्यांना पुणे येथे अटक करण्यात आली. तिसऱ्या प्रकरणात दोन सुदानी नागरिक पाटणा येथून मुंबईत पोहोचले होते. त्यांना मुंबईत अटक करण्यात आली. तसेच मुंबई शहरात आलेले आणखी २० किलो सोने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले.
मुंबई, पुणे, पाटणा अशा तीन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून या तीनही ठिकाणाहून हे सोने मुंबईत आणण्यात येत होते. यातील पहिली कारवाई पाटणा येथे झाली. दुसरी कारवाई पुण्यात झाली तर तिसरी कारवाई मुंबईत करण्यात आली.