अमेरिकेहून परतलेल्या दाम्पत्याची हत्या; चालकानं मित्राच्या मदतीनं मृतदेह फार्म हाऊसवर पुरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 20:54 IST2022-05-09T20:47:47+5:302022-05-09T20:54:30+5:30
लेकीला भेटून मायदेशी परतलेल्या वृद्ध दाम्पत्याचा खून; पोलिसांनी खुनाचं गूढ उकललं

अमेरिकेहून परतलेल्या दाम्पत्याची हत्या; चालकानं मित्राच्या मदतीनं मृतदेह फार्म हाऊसवर पुरले
चेन्नई: तमिळनाडूच्या चेन्नईत धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेहून परतलेल्या दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याचा चालक आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. अमेरिकेत असलेल्या मुलीला भेटून भारतात परतलेलं दाम्पत्य अचानक बेपत्ता झालं. त्याबद्दलची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी तपास सुरू करताच एकापाठोपाठ एक कंगोरे उलगडत गेले. त्यानंतर दोन आरोपींना अटक झाली.
दाम्पत्याचा चालक कृष्णा मूळचा नेपाळचा असून तोच पती-पत्नीला विमानतळावरून आणण्यासाठी गेला होता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली. त्याच दिवसापासून तिघे बेपत्ता होते. पोलिसांनी दाम्पत्याची कॉल हिस्ट्री काढली. दाम्पत्य चालकाच्या सोबत होते, हे त्यातून स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी कृष्णा आणि त्याच्या मित्राला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला.
वृद्ध दाम्पत्याची हत्या त्यांच्याच घरात करण्यात आल्याची कबुली दोघांनी दिली. मैलापूर येथे असलेल्या द्वारका कॉलनीतील घरात दोघांचा खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचे मृतदेह नेमेल्लीतील फॉर्महाऊसवर पुरण्यात आले. पोलीस दोन्ही आरोपींना घेऊन फार्म हाऊसवर पोहोचले. वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मारहाणीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाली.