नक्षलवाद्यांकडून ड्रोन कॅमेराने पोलिसांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:26 PM2020-10-11T12:26:06+5:302020-10-11T12:26:28+5:30
Naxalites drone: अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास आकाशात ड्रोन फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलवाद्यांनी ड्रोन कॅमेराने पोलिसांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच गोळीबार करून तो प्रयत्न हाणून पाडला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या घटनेला दुजोरा दिला, पण तो ड्रोन नक्षलवाद्यांचा होता की आणखी कोणाचा हे आताच सांगू शकणार नसल्याचे ते म्हणाले.
प्राप्त माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास आकाशात ड्रोन फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. लागलीच सर्वजण सतर्क झाले, पण काही वेळातच ते ड्रोन गायब झाले. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास पुन्हा ड्रोन दिसताच सतर्क असलेल्या पोलिसांची त्यावर गोळीबार केला. पण नक्षलवादी हल्ला करण्याची शक्यता पाहता रात्रीच्या अंधारात पोलीस परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेऊ शकले नाही. सकाळपासून त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान वाढविण्यात आले. पोलिसांच्या हालचाली टिपण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर होण्याची ही घटना नक्षलविरोधी अभियानासाठी नवीन आव्हान ठरू शकते.