भूगोलाची १० गुणांची परीक्षा चुकविण्यासाठी अपहरणनाट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 04:31 PM2019-07-30T16:31:59+5:302019-07-30T16:39:36+5:30

सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला.

To drop geography exam created drama of kidnapping | भूगोलाची १० गुणांची परीक्षा चुकविण्यासाठी अपहरणनाट्य

भूगोलाची १० गुणांची परीक्षा चुकविण्यासाठी अपहरणनाट्य

Next
ठळक मुद्देभूगोलाची १० गुणांची परीक्षा चुकविण्यासाठी त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केलाफोन घेण्यासाठी रिक्षा थांबताच आपण पळ काढला.रात्रभर सहार पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस अपहरणाचा उलगडा करण्याच्या कामात व्यस्त होता.

मुंबई : ‘नमाज पठण करून घरी परतत असताना, रिक्षात बसलेल्या त्रिकूटाने अपहरण केले. घाटकोपरमध्ये पोहोचताच एका आरोपीचा फोन खाली पडला म्हणून रिक्षा थांबली आणि तीच संधी साधून मी पळ काढला...’ अशी आपल्या अपहरणाची माहिती रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आई-वडिलांसोबत आलेल्या सातवीच्या विद्यार्थ्याने दिली. त्यानुसार आरोपींना शोधण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली. मात्र तपासात, भूगोलाची १० गुणांची परीक्षा चुकविण्यासाठी त्याने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केल्याचे समोर येताच पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.
अंधेरीत १३ वर्षीय रोहन (नावात बदल) आईवडिलांसोबत राहतो. तो सातवीत आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीत, रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास नमाज पठण करून घरी येताना, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षातील तरुणांनी त्याला बोलावले. रिक्षात कोंबून कुर्ला मार्गे ते पुढे निघाले. घाटकोपर गुन्हे शाखेसमोर पोहोचताच एका आरोपीचा फोन वाजला. तो फोन घेत असतानाच फोन खाली पडला. फोन घेण्यासाठी रिक्षा थांबताच आपण पळ काढला.
सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले. घाटकोपर परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये तो घाटकोपर गुन्हे शाखेपासून २०० मीटर अंतरावर निवांत चालत जात पुढे बस पकडताना दिसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. मात्र, तो त्याच्या माहितीवर ठाम असल्याने रात्रभर सहार पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस अपहरणाचा उलगडा करण्याच्या कामात व्यस्त होता.

...आणि अपहरणनाट्यामागील ‘भूगोल’ सापडला

रोहनला भूगोलाचा पेपर अवघड जातो. त्यामुळे तो नेहमीच पालकांचा ओरडा खात असे. सोमवारीही त्याची भूगोलाची परीक्षा होती. ती टाळण्यासाठी त्याने हा प्रताप केला. चौकशीत, त्याच्या एका मित्राकडून त्याला ही कल्पना सुचल्याचेही समोर आले. या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल केला नसून केवळ घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती सहार पोलिसांनी दिली.

Web Title: To drop geography exam created drama of kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.