ड्रग्जमाफिया ललितचा भाऊ भूषणसह साथीदार अभिषेक ला सात दिवसांची पोलीस कोठडी
By अझहर शेख | Published: December 6, 2023 07:42 PM2023-12-06T19:42:29+5:302023-12-06T19:43:39+5:30
नाशिक पोलिसांनी घेतला ताबा
अझहर शेख, नाशिक: बहुचर्चित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचा भाऊ संशयित मास्टरमाइंड भूषण पानपाटील व त्याचा ‘खजिनदार’ अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा नाशिक पोलिसांनी पुणे पोलिसांकडून मंगळवारी घेतला. बुधवारी (दि.६) जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.यु मोरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यांनी दोघांना येत्या बुधवारपर्यंत (दि.१३) तर त्यांचा साथीदार संशयित शिवाजी शिंदे यास शनिवारपर्यंत (दि.९) पोलीस कोठडी सुनावली.
दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या शिंदे गावात नाशिकरोड पोलिसांनी धाड टाकून एक गोदाम उद्ध्वस्त केले होते. या गोदामातून एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारा कच्च्या मालाचा साठा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हस्तगत केला होता. आढळून आला होता. हे गोदाम संशयित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचे की त्याचा भाऊ संशयित भूषण पानपाटीलचे?, असा प्रश्न कायम होता. यासाठी नाशिक पोलिसांना संशयित शिवाजी शिंदेसह भुषण व अभिषेक यांचाही ताबा मिळण्याची प्रतीक्षा होती. कारण त्यांच्या चौकशीनंतरच या गुन्ह्याच्या तपासााला वेग देता येणार आहे. मुंबई पोलिसांकडून शिंदेचा ताबा घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर पुणे पोलिसांकडून भुषण व अभिषेक यांचाही ताबा पोलिसांनी घेतला. शिंदेची पोलीस कोठडी बुधवारी (दि.६) संपल्याने त्याला न्यालयात हजर करण्यात आले. त्यास पुन्हा तीन दिवसांची कोठडीत वाढ करण्यात आली. तसेच पुढील चौकशीकरिता भुषण व अभिषेक यांच्या कोठडीची मागणी सरकारपक्षाकडून ॲड. देवरे यांनी केली.