ब्राउन शुगरसह अमली पदार्थांच्या तस्करांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 02:13 AM2020-12-23T02:13:58+5:302020-12-23T02:14:12+5:30
Crime News : स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, भास्कर जाधव आदींचे पथक २१ डिसेंबर रोजी गणेशपुरी मुरबाड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत होते.
ठाणे : ब्राउन शुगरसह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जाहीद शेख (३०, रा. मुठवल, भिवंडी) आणि ईश्वर मिश्रा (३९, रा. उत्तर प्रदेश) या दोघांना भिवंडी पिसे रोडवरील सावद येथून ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी १३ लाख ७९ हजारांचे ब्राउन शुगर आणि एमडी पावडर हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, भास्कर जाधव आदींचे पथक २१ डिसेंबर रोजी गणेशपुरी मुरबाड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिसा डॅमच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण उभ्या कारमध्ये संशयास्पद हालचाली करताना आढळल्याने त्यांना या पथकाने ताब्यात घेतले. जाहीद आणि ईश्वर अशी नावे सांगणाऱ्या या दोघांच्या कारची या पथकाने झडती घेतली, तेव्हा त्यांच्या डिक्कीतील डब्यातून एक किलो ७० ग्रॅम वजनाचे ब्राउन शुगर व एक किलो ७०० ग्रॅम वजनाची एमडी पावडर, तसेच एक डिजिटल वजन काटा असा एक कोटी १३ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. त्यांनी या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
२६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.