बावनचाळीमध्ये होतोय अमली पदार्थांचा व्यापार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:59 AM2021-03-30T01:59:40+5:302021-03-30T01:59:59+5:30
हा परिसर निर्जन असल्याने या ठिकाणी दिवसाढवळ्या, तसेच रात्री बिनदिक्कतपणे अवैध धंदे सुरू असतात. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, प्रेमी युगुलांचा सकाळपासूनच या ठिकाणी राबता असतो. एकीकडे अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असताना, दुसरीकडे एकट्या-दुकट्या जाणाऱ्या मुली, तरुणींचा विनयभंग, बलात्कार झाल्याचे प्रकार या ठिकाणी या आधी घडले आहेत
डोंबिवली : अनैतिक धंद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बावनचाळीतील पडक्या वास्तुंलगतच्या परिसराचा वापर अमली पदार्थांच्या व्यापारासाठी होत असल्याचे विष्णूनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. बावनचाळ परिसरातील रेल्वेग्राउंड असो, अथवा तेथील पडक्या, भग्नावस्थेतील वास्तूंच्या भागात बिनदिककतपणे दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असताना आता गांजाच्या विक्रीसाठी आलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
हा परिसर निर्जन असल्याने या ठिकाणी दिवसाढवळ्या, तसेच रात्री बिनदिक्कतपणे अवैध धंदे सुरू असतात. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, प्रेमी युगुलांचा सकाळपासूनच या ठिकाणी राबता असतो. एकीकडे अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असताना, दुसरीकडे एकट्या-दुकट्या जाणाऱ्या मुली, तरुणींचा विनयभंग, बलात्कार झाल्याचे प्रकार या ठिकाणी या आधी घडले आहेत. येथील मोडकळीस आलेल्या खोल्यांच्या परिसरात गांजाचा व्यापार जोमाने चालत असल्याची सूत्राची माहिती आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता एक व्यक्ती गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत विष्णुनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांच्यासह त्यांच्या पथकाने परिसरात सापळा लावला असता, एक व्यक्ती संशयितरीत्या फिरताना आढळला.
ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजा मिळून आला. समीर हरिश्चंद्र भोईर (वय ३२) असे त्याचे नाव असून, तो पश्चिमेकडील उमेशनगरमध्ये वास्तव्याला आहे. तो गांजा विक्रीसाठी आला होता. त्याच्याकडे एक किलो वजनाचा गांजा आणि काही रोख रककम आढळली. अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.