अत्यावश्यक सेवेआड मुंबईत आणले ड्रग्ज; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 04:18 AM2020-07-03T04:18:40+5:302020-07-03T04:18:49+5:30
६० लाखांचे हेरॉइन, गांजा जप्त
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वाहतूक सेवा बंद असतानाही मुंबईत ६० लाखांचा गांजा आणि हेरॉइनची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली. अली मोहम्मद शफी आलम शेख (६०) असे आरोपीचे नाव असून, त्याने भाजीपालासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून हा माल मुंबईत आणल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
लॉकडाऊनच्या काळात चित्ता कॅम्प परिसरात राहणारा अली अत्यावश्यक सेवेआड ड्रग्जचा साठा मुंबईत आणत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. कक्ष ४ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, सपोनि विनोद माळवे, राजेश पाटील, बिभीषण गव्हाणे आणि अंमलदारांनी तपास सुरू केला. बुधवारी एक जण चित्ता कॅम्प परिसरात लाखोंच्या हेरॉइन आणि गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.