संत्र्याच्या ट्रकमध्ये १४७६ कोटींचे ड्रग्ज; केंद्रीय यंत्रणेची नवी मुंबईत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 09:18 AM2022-10-02T09:18:19+5:302022-10-02T09:18:52+5:30
अमली पदार्थाचा मोठा साठा नवी मुंबईत आल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नवी मुंबई येथे येणाऱ्या एका संत्र्याच्या ट्रकमधून केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी तब्बल २०० किलो अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत १४७६ कोटी रुपये इतकी आहे. अलीकडच्या काळात अमली पदार्थ पकडण्याची ही मोठी कारवाई मानली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थाचा मोठा साठा नवी मुंबईत आल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. तसेच याची वाहतूक भाजीपाला किंवा फळांच्या ट्रकमधून होणार असल्याचेही अधिकाऱ्यांना १० ते १२ दिवसांपूर्वी समजले होते. त्या अनुषंगाने विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढण्यास सुरुवात केली असता दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर संत्री भारतात आल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. ही संत्री एका कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवली होती. तेथून ही संत्री एका ट्रकच्या माध्यमातून नवी मुंबईत जाणार असल्याची नेमकी माहिती प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासूनच अधिकाऱ्यांनी यावर पाळत ठेवली. शनिवारी हा ट्रक कोल्ड स्टोअरेजमधून बाहेर पडल्यानंतर वाशी येथे त्याला थांबवून या ट्रकची झडती घेण्यात आली.
संत्र्यांनी भरलेल्या या ट्रकमध्ये या अधिकाऱ्यांना तब्बल १९८ किलो मेथॅम्फेटाईन आणि नऊ किलो कोकेन आढळून आले. संत्री आयात करणाऱ्या व्यापाऱ्याला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तसेच ट्रक देखील जप्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"