गेल्या १४ महिन्यांत केले १०० कोटींचे ड्रग्ज जप्त; एनसीबीची कारवाई, ३०५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 07:03 AM2021-10-18T07:03:25+5:302021-10-18T07:03:51+5:30
एनसीबीच्या तपासात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही. तर, मोठे उद्योगपती, व्यावसायिक, धनाढ्य व्यक्ती आणि राजकारणी व्यक्तींची नावेदेखील समोर आली आहेत.
मुंबई : कार्डेलिया क्रुझ ड्रग्स पार्टीमुळे चर्चेत असलेल्या एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यांपासून ड्रग्जविरोधात धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. एनसीबीने गेल्या १३ महिन्यात १०० कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. यात, ३०५ जणांवर अटकेची कारवाई केली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्जप्रकरण समोर आल्यानंतर एनसीबीने तपास सुरू करत अंमली पदार्थ सेवनासह ड्रग्ज विक्री आणि तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. एनसीबीच्या तपासात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही. तर, मोठे उद्योगपती, व्यावसायिक, धनाढ्य व्यक्ती आणि राजकारणी व्यक्तींची नावेदेखील समोर आली आहेत. यातील काही बडे मासे एनसीबीच्या गळालाही लागले. कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या मुंबईतील ड्रग्ज सिंडिकेटही उद्ध्वस्त केले. पुढे हा तपास बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेपर्यंत येऊन पोहोचला. एनसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख म्हणून वानखेडे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यापासून ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या वर्षी ४६ कारवाई करत १११ जणांना अटक केली. तर यावर्षी ९८ गुन्हे नोंदवत १९८ जणांना अटक केली.
या कारवाईत आतापर्यंत कोडियन १०१.५ किलो, चरस ४१ किलो, हीरोइन ८ किलो, गांजा ३१८ किलो, इफेड्रिन १०.५ किलो, मेफेड्रोन १४ किलोसह विविध ९० ते १०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती एनसीबीने दिली. या कारवाई दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तस्करांच्या हल्ल्यालाही तोंड द्यावे लागले होते.