बापरे! साडे बारा कोटींचे ड्रग्स डोंगरातून जप्त; त्रिकुटाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 09:38 PM2021-02-22T21:38:57+5:302021-02-22T21:39:21+5:30
Drugs Seized : जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत १२ कोटी ५० लाख रुपये असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील डोंगरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत २५ किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत १२ कोटी ५० लाख रुपये असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
डोंगरी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरूवारी डोंगरी परिसरातून इसाक इक्बाल हुसेन सय्यद(३८) याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून १२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे नवी मुंबईतील वाशी परिसरातून अब्दुल वासिम अब्दुल अझीझ शेख(३१) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५६ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला होता.
त्यानंतर आरोपींकडील सविस्तर माहितीच्या आधारे घाटकोपर परिसरातून दिपक संजीव बांगेरा (५५) याला अटक करण्यात आली. सांताक्रुझ येथील तो रहिवासी असून त्यांच्या माहितीवरून कलिना गाव येथील सन फ्लॉवर अपार्टमेंट येथील घरावर डोंगरी पोलिसांनी रविवारी छापा टाकला. त्यावेळी तब्बल २५ किलो एमडी (किंमत १२ कोटी ५० लाख रुपये), पाच लाख रोख, दोन वजन मशीन, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांना सापडले असन पोलिसांनी ते जप्त केले आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.