दारुड्याने चालविली स्कूलबस; ४० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:02 AM2022-12-14T10:02:21+5:302022-12-14T10:02:43+5:30
उलवे येथे मंगळवारी सकाळी आयएमएस शाळेची बस रिक्षाला धडकली. यावेळी बसमध्ये सुमारे चाळीस विद्यार्थी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मद्यधुंद अवस्थेत स्कूलबस चालवून ४० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. उलवे येथील खासगी शाळेच्या स्कूल बसबाबत हा प्रकार घडला आहे.
उलवे येथे मंगळवारी सकाळी आयएमएस शाळेची बस रिक्षाला धडकली. यावेळी बसमध्ये सुमारे चाळीस विद्यार्थी होते. स्कूलबस रिक्षाला धडकल्यामुळे रिक्षाचालक व नागरिकांनी बसमध्ये डोकावले असता, स्कूलबसचा चालक मद्यधुंद अवस्थेत डुलत असल्याचे आढळले. त्याला बसतादेखील येत नसल्याने तो स्टेअरिंगवर लोळत होता. अशा अवस्थेत त्याच्याकडून अति वेगात बस पळवली जाऊन नियंत्रण सुटले असता, मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, रिक्षाला बस धडकल्याने वेळीच हा प्रकार उघड झाला. या घटनेनंतर पर्यायी व्यवस्था करून विद्यार्थ्यांना तिथून हलवण्यात आले.
पालकांनी या घटनेची तक्रार शाळा व्यवस्थापनाकडे केली. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत बस चालवून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी अशोक थोरात याच्यावर गुन्हा दाखल केला.