मद्यपी दुचाकीस्वारांचा धिंगाणा, माय-लेकावर चॉपरने वार, दोघांना दुखापत, वर्दळीच्या ठिकाणी दहशत

By विजय.सैतवाल | Published: February 26, 2024 12:32 AM2024-02-26T00:32:44+5:302024-02-26T00:32:56+5:30

मुलाचा वार आईने झेलला, झटापटीत शर्ट फाटले, भरदिवसा शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांची दहशत

Drunken bikers rampage, chopper hits My-Lake, two injured, terror in busy evening | मद्यपी दुचाकीस्वारांचा धिंगाणा, माय-लेकावर चॉपरने वार, दोघांना दुखापत, वर्दळीच्या ठिकाणी दहशत

मद्यपी दुचाकीस्वारांचा धिंगाणा, माय-लेकावर चॉपरने वार, दोघांना दुखापत, वर्दळीच्या ठिकाणी दहशत

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: रस्त्याने जात असताना दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन मद्यपी दुचाकीस्वारांनी आशाबाई प्रभाकर पाटील (रा. बालाजी पेठ) या महिलेसह त्यांच्या मुलावर चॉपरने वार केला. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. ही घटना रविवार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शेजारील गल्लीत घडली. याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

बाजाली पेठ परिसरातील रहिवासी आशाबाई पाटील या रविवार, २५ फेब्रुवारी त्यांचा मुलगा गणेश सोबत एरंडोल येथे गेल्या होत्या. सायंकाळी त्या जळगावात परतल्या व घरी जात असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शेजारील गल्लीत दुचाकीवर जाणाऱ्या मद्यपी तरुणांनी कट मारला. त्याविषयी आशाबाई व मुलाने दुचाकीस्वारांना जाब विचारला. ते तरुण महिलेच्या दिशेने आले व त्यांनी महिलेसह त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेले. आशाबाई यांनी त्याला प्रतिकार केला असता मद्यपी तरुणाने त्याच्या कंबरेला खोचलेला चॉपर काढून महिलेवर वार केला.

मुलाचा वार आईने झेलला, झटापटीत शर्ट फाटले

मद्यपी तरुण गणेश याच्यावरही चॉपरने वार करत असताना आशाबाई मध्ये आल्या व त्यांनी तो वार हातावर झेलला. त्या वेळी झटापट झाल्याने मद्यपी तरुणाचा शर्टही फाटला. या घटनेत महिला व मुलाला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.  

भरदिवसा शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांची दहशत

भरदिवसा महिलेवर चॉपरने वार झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ गणेश पाटील याने तयार केला असून तो पोलिसांकडे दिला आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात असून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. भरदिवसा शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांची व मद्यपींची दहशत वाढत असून रस्त्याने महिलांची सुरक्षितता आहे की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Web Title: Drunken bikers rampage, chopper hits My-Lake, two injured, terror in busy evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.