दिरानं वहिनीला विजेचा शॉक देऊन संपवलं; कारण ऐकून पोलीस हैराण, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 01:46 PM2021-11-09T13:46:39+5:302021-11-09T13:48:16+5:30
वहिनीची हत्या करून दीर पोलीस ठाण्यात; गुन्ह्याची कबुली
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एका सहाय्यक प्राध्यापकाच्या पत्नीची हत्या झाली आहे. दिल्ली विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापकाचं कुटुंब बुराडीमध्ये वास्तव्यास आहे. प्राध्यापकाची पत्नीची करंट देऊन हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या दिराला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.
मृत महिलेच्या कुटुंबियांनी ऑगस्टमध्येच बुराडीतील पोलीस ठाण्यात हत्येचा संशय व्यक्त करून तक्रार दाखल केली होती. संत नगरमधील एका घराच्या चौथ्या मजल्यावर विरेंद्र त्याची पत्नी पिंकी आणि वृद्ध आई वडिलांसह वास्तव्यास होता. फेब्रुवारीत विरेंद्रचा विवाह पिंकीसोबत झाला. लग्नापूर्वी विरेंद्रचा मामेभाऊ राकेशदेखील त्याच्या कुटुंबासोबत वास्तव्यास होता.
लग्न झाल्यानंतर पिंकीनं राकेशच्या कुटुंबाच्या वास्तव्याबद्दल आक्षेप घेतला. त्यामुळे कुटुंबात वाद झाला. हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला. ऑगस्टमध्ये राकेश त्याच्या कुटुंबाला घेऊन दुसरीकडे राहायला गेला. तो पेशानं वाहन चालक आहे. राकेश सोमवारी विरेंद्रच्या घरी गेला होता. दरवाजा उघडाच असल्यानं तो थेट आत शिरला. त्यानं पिंकीचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गळा दाबल्यानं पिंकी बेशुद्ध पडली. त्यानंतर राकेशनं विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली.
पिंकीला संपवल्यानंतर राकेशनं पोलीस ठाणं गाठलं आणि हत्येची कबुली दिली. वहिनीनं त्रास दिल्याचा आरोप त्यानं केला. तर पिंकीचा पती विरेंद्रचे राकेशच्या पत्नीशी अवैध संबंध असल्याचा आरोप पिंकीच्या कुटुंबीयांनी केला. पिंकीच्या आईनं ६ ऑगस्टला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.