कर्जाची रक्कम घेऊन पसार झालेल्या नोकराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 03:30 AM2019-06-27T03:30:49+5:302019-06-27T03:31:01+5:30
कामासाठी मित्राकडून घेतलेल्या कर्जाची २४ लाखांची रक्कम नोकरामार्फत व्यापाऱ्याने परत पाठविली.
मुंबई : कामासाठी मित्राकडून घेतलेल्या कर्जाची २४ लाखांची रक्कम नोकरामार्फत व्यापाऱ्याने परत पाठविली. मात्र, नोकर ते पैसे घेऊन पसार झाला. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, वाराणसीतून त्याला अटक करण्यात आली आणि चोरीच्या रकमेपैकी ९० टक्के रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
दिनेश जैस्वार असे अटक आरोपीचे नाव आहे. कांदिवली पश्चिमेच्या एका प्लायवूडच्या दुकानात गेली दोन वर्षे तो काम करत आहे. दुकानाचे मालक कांतीलाल पटेल यांनी जैस्वारला गेल्या आठवड्यात २४ लाख रुपये दिले. त्यांनी ते पैसे त्यांचा महावीरनगर परिसरात राहणारा मित्र भावेश शाह यांच्याकडून कामानिमित्त घेतले होते. त्यामुळे ते शाह यांना परत नेऊन देण्यास त्याला सांगण्यात आले. मात्र, जैस्वार पैसे घेऊन पसार झाला. पटेल यांनी त्याला बºयाचदा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी शाह यांच्याकडे विचारणा केली असता, जैस्वार त्यांच्याकडे पैसे घेऊन आलाच नसल्याने त्यांना समजले. अखेर पटेल यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली.
तपासात जैस्वार वाराणसीला पळून गेल्याचे समजताच, परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार आणि कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक वाराणसीला रवाना झाले. तेथून नातेवाइकांकडे लपून बसलेल्या जैस्वारला सापळा रचून अटक त्यांनी केली.