जबीर मोतीच्या अटकेमुळे दाऊदची पोल खोल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 08:47 PM2018-08-22T20:47:08+5:302018-08-22T20:48:22+5:30
जबीरने उद्योगपती प्रमोद गोएंका यांचं मोझाम्बिकामध्ये अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा विश्वासू साथीदार मानला जाणाऱ्या जबीर मोती याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या अटकेमागे दाऊदचा हात असल्याचा दावा केला जात आहे. दाऊद सध्या खूप आजारी आहे. त्याच्याशी विश्वासघात करण्याची शक्यता असलेल्यांना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकवून त्यांना अद्दल घडवत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. जबीर हा दाऊदचा अमेरिका आणि इंग्लंडमधील आर्थिक कारभार सांभाळत होता. त्याचे इक्बाल मिर्ची आणि मिर्चीचा लंडनमध्ये राहणारा भाचा आसिफ यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. या आसिफच्याच सांगण्यावरून जबीरने उद्योगपती प्रमोद गोएंका यांचं मोझाम्बिकामध्ये अपहरण केल्याचे बोलले जात आहे. जबीरच्या अटकेमुळे दाऊदच्या माहितीसोबतच या अपहरणाचाही उलगडा होण्याची आशा तपास यंत्रणांना आहे.
कुख्यात गुंड दाऊदचा व्यवसाय अमेरिका, इंग्लंडसोबत काही अफ्रिकी देशांत आहे. हा व्यवसाय दाऊदला हळूहळू कमी करायचा आहे. शिल्लक राहणार धंदा कुटुंबातीलच कोणीतरी सांभाळावा अशी त्याची आकांक्षा आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दाऊदचा भाऊ अनीस इब्राहीमचे वर्चस्व टोळीमध्ये वाढलं आहे. आपला मृत्यू झाला तर आपल्या कुटुंबाला कोणताही धोका नको म्हणून दाऊदने त्याला धोकादायक वाटत असलेल्या सहकाऱ्यांना धडा शिकवायचे ठरवल्याचे बोलले जात आहे.