सुट्या पैशांवरून झालेल्या वादातून बसवर दगफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 11:30 PM2019-04-10T23:30:01+5:302019-04-10T23:35:01+5:30
बसमधील प्रवासी जखमी; माथेफिरूला अटक
मुंबई - बेस्ट बसमध्ये वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशांवरून झालेला वाद इतका टोकाला गेला की संतप्त प्रवाशाने बसमधून उतरल्यानंतर बसवरच दगडफेक केली. या वेळी वाहकासह बसमधील एक प्रवासी जखमी झाला. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका माथेफिरूला अटक केली.
मुंबईतील बेस्ट बसमध्ये सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात शाब्दिक बाचाबाची होते. नुकताच चेंबूर मार्गे धावणाऱ्या बस क्रमांक 356 मध्ये घडला होता. तसाच प्रकार चेंबूरमध्ये घडला. प्रवासी असलेल्या जुबेर खान हा चेंबूर मार्गे प्रवास करत होता. सुट्ट्या पैशांवरून त्याचा बसचे वाहक प्रकाश राठोड यांच्याशी वाद झाला. हा वाद इतका पेटला की, चेंबूरमधील पोस्टल कॉलनी परिसरात बस पोहचल्यानंतर खान बसमधून उतरला. तेव्हा राग अनावर झालेल्या खान याने रस्त्यावरील दगड उचलून बसच्या दिशेने भिरकावला. हा दगड बसमधील एका प्रवाशाच्या डोक्याला लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर बसच्या वाहकाने थेट पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून पाचारण केले होते.
दगड लागून जखमी झालेल्या प्रवाशाला तातडीने घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही मिनिटातच गस्तीवर असलेले नेहरू नगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी खान याला ताब्यात घेतले. वाहक राठोड यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी खान याला अटक केली. दरम्यान, जखमी प्रवाशाला उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.