जेवण उशिरा करण्याच्या कारणावरुन मुलाकडून जन्मदात्या आईचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 05:16 PM2019-11-23T17:16:14+5:302019-11-23T17:17:17+5:30
बहिणीवर वार करुन केले गंभीर जखमी
पुणे : जेवण उशिरा का तयार केले' या कारणावरुन भांडण काढुन रागाने चिडुन जाऊन जन्मदात्या आईवर घरातील चाकुने पोटात जीवघेणा वार करुन जिवे ठार मारल्याची घटना वाघोली येथील गणेश नगर परिसरातील 'तारा तरंग'या सोसायटीत घडली. आईला वाचवण्यासाठी गेलेल्या बहीणसही या निर्दयी भावाने चाकुने जीवघेणा हल्ला करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले.घटनेत मृत पावलेल्या आईचे नाव लिलाबाई शामराव चव्हाण (वय५२वर्षे)असुन, जखमी बहिणीस उपचारासाठी वाघोलीतील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात करण्यात आले आहे.
गणेश शामराव चव्हाण, वय-३५ वर्षे(रा.तारातरंग सोसायटी,गणेश नगर,वाघोली)असे हल्लेखार आरोपीचे नाव असून,याबाबत बहीण प्रिया रवींद्र भोसले,वय-२४ वर्षे(रा.कात्रज,पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपी भावा विरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
ही घटना काल रात्री ८ ते ९ च्या दरम्यान वाघोली येथील रासयोनी महाविद्यालयाजवळील 'तारातरंग' सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लटमध्ये घडली.
हवेली उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील यांच्या सह,कालचं नव्याने नियुक्त झालेले लोणीकंद पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरिक्षक प्रताप मानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पहाणी केली व त्यानुसार पोलीसांना तपासाच्या सुचना दिल्या.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक केशव वाबळे व लोणीकंद पोलीस करत आहेत.