नालासोपाऱ्यात बनावट व्हिसा बनविणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:44 PM2018-10-18T21:44:59+5:302018-10-18T21:46:14+5:30
घरातून बनावट व्हिसा बनविण्यासाठी लागणारे संगणक, प्रिंटर, ग्राफिक कार्ड, स्क्रिन बोर्ड, प्रेस मशीन, नंबरींग मशिन, लॅमिनेशन रोल, विविध रंगाचे डब्बे आदी साहित्य याशिवाय अमेरिका आणि चीन या देशांचे काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
नालासोपारा - नालासोपारा पोलिसांनी बनावट व्हिसा बनविणाचा अड्डा उध्दवस्त केला असून या प्रकऱणी एका आरोपीला अटक केली आहे. बनावट व्हिसाच्या आधारे त्याने अनेक जणांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठविल्याचा पोलिसांना संशय आहे.
नालासोपारा पश्चिमेच्या श्रीपस्थ संकुलातील एका इमारतीत बनावट व्हिसा बनविला जात असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा घालून उस्मान गनी शेख (वय ५८) या आरोपीला अटक केली. त्याच्या घरातून बनावट व्हिसा बनविण्यासाठी लागणारे संगणक, प्रिंटर, ग्राफिक कार्ड, स्क्रिन बोर्ड, प्रेस मशीन, नंबरींग मशिन, लॅमिनेशन रोल, विविध रंगाचे डब्बे आदी साहित्य याशिवाय अमेरिका आणि चीन या देशांचे काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शेख बनावट व्हिसा बनविण्यासाठी दहा हजार रुपये घेत होता. २००६ मध्ये त्याला अशाच एका प्रकरणात अटक कऱण्यात आली होती. जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा हे काम सुरू केले. या आरोपीने बनावट व्हिसा देऊन कुणाला परदेशी पाठवले आहे का आणि त्याच्या टोळीत अन्य कोण साथीदार आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत अशी माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अक्षीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.