आर्थिक अडचणीमुळे चिंता वाढली, विम्याच्या रकमेसाठी व्यापाऱ्याने स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:42 PM2020-06-15T17:42:39+5:302020-06-15T17:43:30+5:30
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या व्यापाऱ्याने विम्याची रक्कम आपल्या नातेवाईकांना मिळावी यासाठी स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली होती. तसेच ठरलेल्या योजनेनुसार नंतर सुपारी घेणाऱ्या चार जणांनी या व्यक्तीची हत्या केल्याचे, तपासात उघड झाले आहे.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये हत्येचा एक विचित्र गुन्हा समोर आला आहे. येथील कडकड्डूमा परिसरातून बेपत्ता झालेल्या एका व्यावसायिकाच्या हत्येचे गुढ पोलिसांनी उकलले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह एकूण चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, पोलीस तपासामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या व्यापाऱ्याने विम्याची रक्कम आपल्या नातेवाईकांना मिळावी यासाठी स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली होती. तसेच ठरलेल्या योजनेनुसार नंतर सुपारी घेणाऱ्या चार जणांनी या व्यक्तीची हत्या केल्याचे, तपासात उघड झाले आहे.
या व्यापाऱ्याचा मृतदेह १० जून रोजी दिल्लीतील रणहोला भागात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. तसेच या मृतदेहाचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते. १० जून रोजी शानू बन्सल नावाच्या महिलेने आपले पती गौरव बन्सल हे बेपत्ता असल्याची तक्रार आनंद विहार पोलीस ठाण्यात दिली होती. व्यवसायात नुकसान झाल्याने गौरव बन्सल चिंतेत होते. त्यांनी फेब्रुवारीमध्ये ६ लाखांचे पर्सनल लोक घेतले होते. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून त्यांच्या माहितीशिवाय ३.५० लाखांचे पेमेंटसुद्धा झाले होते. त्याची माहिती मयूर विहार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र गौरव यांचे कुणाशीही भांडण नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.
मात्र तक्रारीपूर्वीच १० जून रोजी त्यांचा मृतदेह रणहोला भागात सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा संशय घेऊन तपास सुरू केला. प्राथमिक तपासामध्ये गौरव यांनी बेपत्ता होण्यापूर्वी एका अल्पवयीनाशी फोनद्वारे संपर्क साधून स्वत:च्याच हत्येची सुपारी दिल्याचे उघड झाले. ठरल्याप्रमाणे गौरव यांनी आपली कार घरीच ठेवली आणि कुठल्यातरी अन्य साधनाने ते रणहोला येथे पोहोचले. वाटेत असताना त्यांनी आरोपींना व्हॉट्स अॅपवरून आपला फोटो पाठवला होता. तिथे गेल्यावर आरोपींनी त्यांना पकडून त्यांचे हातपाय बांधले आणि त्यांना फासावर लटकवले.
आता या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह मनोज कुमार यादव, सूरज आणि सुमित कुमार या तिघांना अटक केली आहे. आता पोलीस या हत्येसाठी किती रुपयांना सुपारी देण्यात आली आहे आणि एकूण किती रकमेची सुपारी ठरली आहे. याचा शोध घेत आहेत. तसेच गौरव यांच्यावर किती रुपयांचे कर्ज होते आणि विमा कितीचा होता याचाही शोध घेतला जात आहे.