‘गुगल’गुरूमुळे त्याने सुरु केला बनावट नोटांचा कारखाना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 10:03 PM2020-02-18T22:03:43+5:302020-02-18T22:06:36+5:30
चक्क २ हजार रुपयांच्या हुबेहुब नोटा बनविण्याचा कारखाना कोंढव्यातील आपल्या घरात सुरु
पुणे : कंपनीत कामाला असताना त्याचे काम सुटले़ त्यानंतर त्याने गुगलवरुन नोटा कशा बनवायच्या याचा अभ्यास केला. त्यात दाखविलेल्याप्रमाणे त्याने साहित्य आणून चक्क २ हजार रुपयांच्या हुबेहुब नोटा बनविण्याचा कारखाना कोंढव्यातील आपल्या घरात सुरु केला होता. गेले वर्षभर त्याचा हा उद्योग सुरु होता. लोकांना कमिशनवर तो बनावट नोटा देत असे. पुण्यासह अनेक शहरांमध्ये त्याने या बनावट नोटा विकल्या होत्या. त्याने पुण्यात दोघा जणांना भवानी पेठेत बनावट नोटा चालविण्यासाठी पाठविले असताना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्या दोघांना पकडले होते. हे समजल्यावर तो फरार झाला होता. मात्र, केरळ पोलिसांनी त्याला अटक केली होती. खंडणीविरोधी पथकाने त्याला केरळ येथून ताब्यात घेतले.
निधीश उर्फ पंडीत विनायक कळमकर उर्फ अक्षय विलास शर्मा (वय ३६, रा़ उंड्री) असे त्याचे नाव आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातून फरार झाल्यानंतर शर्मा हा हैदराबाद येथे गेला होता. तेव्हा हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली. हैदराबादमध्ये त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल होते़ हैदराबाद पोलिसांकडून केरळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली होती. पुणे शहर तसेच तळेगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल आहे.
शर्मा याने उंड्री येथे एक बंगला भाड्याने घेऊन त्यात २ हजार रुपयांच्या बनावट नोटा बनविण्याचा कारखाना सुरु केला होता. त्याच्याकडून ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन शुभम दिलीप क्षीरसागर (वय २४, रा़ लोणंद, ता़ खंडाळा) आणि राहुल दिनकर वचकल (वय १९, रा़ वीर,ता़ पुरंदर) हे भवानी पेठेतील व्यापाºयांना नोटा विकण्यासाठी २८ जुलै २०१९ रोजी आले होते. तेव्हा खंडणी विरोधी पथकाने त्यांना पकडले़ त्यांच्याकडून शर्मा याची माहिती मिळाली होती़ मात्र, तो तेव्हा फरार झाला.
केरळवरुन त्याला ताब्यात घेऊन पुण्यात आणल्यावर त्याकडे चौकशी करण्यात आली. त्यात त्याने आपण गुगलवरुन नोटा बनविण्याची माहिती घेतली असल्याचे त्याने सांगितले. वर्षभर तो बनावट नोटा छापत असल्याचे व त्याने अनेकांना या नोटा बाजारात वितरीत करण्यासाठी विकल्या असल्याचे सांगितले आहे. आरोपीचे यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का, कोणत्या साहित्यावर छपाई केली आहे. या सर्व बाबींचा तपास पोलिस करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी प्रमोद मगर, मनोज शिंदे, सचिन कोकरे, फिरोज बागवान, मंगेश पवार यांच्या पथकाने केली.