पतीने पैसे न दिल्याने संतापलेल्या महिलेने पोटच्या गोळ्याला पाजले विष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 02:26 PM2018-11-15T14:26:09+5:302018-11-15T17:50:24+5:30
तिचा मुलगा हर्ष (वय ५) याचा मृत्यू झाला असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सांताक्रुझ पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - पतीने घरखर्चाला पैसे न दिल्याच्या रागातून आईने चिमुरड्याला विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना जुहू चौपाटीवर सोमवारी रात्री घडली. रीना राजेश आयरे (वय ३४) असे महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा हर्ष (वय ५) याचा मृत्यू झाला असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सांताक्रुझ पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
जुहू तारा रोडच्या शिवाजीनगर परिसरात रीना ही पती, सासू-सासरे, मुलासह राहते. १२ नोव्हेंबरला रात्री पोलीस नियंत्रण कक्षात एका महिलेने आर्थिक अडचणीला कंटाळून मुलासह स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा कॉल कूपर रुग्णालयातून आला. त्यानुसार सांताक्रुझ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रीना यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी दिलेल्या जबाबात पती राजेश यांच्याकडे त्यांनी घरखर्चासाठी पैसे मागितले होते. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांत भांडण झाले. रागाने रीना हर्षला घेऊन जुहू चौपाटीवर आल्या. रस्त्यात एका दुकानातून उंदीर मारण्याचे विष विकत घेतले. त्यानंतर ते प्राशन केले. आपल्या मागे मुलाचे काय होणार? या काळजीने हर्षलाही विष पाजले. त्याला उलट्या होऊ लागल्या.
मुलाला होणार त्रास पाहून भानावर आलेल्या रीना यांनी तातडीने कूपर रुग्णालयात धाव घेत घडलेल्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले. मंगळवारी उपचारादरम्यान हर्षचा मृत्यू झाला. याप्रकरणी रीना यांच्यावर सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.