फेसबुकवरील 'तो' फोटो अन् टेलरच्या माहितीवरून पोलिसांनी केला हत्येचा उलगडा
By पूनम अपराज | Published: December 7, 2019 08:26 PM2019-12-07T20:26:30+5:302019-12-07T20:28:30+5:30
माहीम येथील समुद्र किनारी सापडलेल्या सुटकेसमध्ये हात, पाय आणि गुप्तांग असे निरनिराळे अवयव पोलिसांना सापडले होते.
- पूनम अपराज
मुंबई - माहीम येथील दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रात माहीम पोलिसांना एक सुटकेस सापडली होती. त्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे अवयव पोलिसांना आढळून आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कक्ष - ५ ने अतिशय क्लिष्ट अशा हत्येचा मेहनतीने आणि तांत्रिक बाबींचा तपास करून उलगडा केला आहे. या हत्याप्रकरणात पोलिसांनी दोघांना वाकोल्यातून अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव आराध्या पाटीलला अटक करण्यात आली असून तिचा अल्पवयीन प्रियकर म्हणजेच विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनी संपत्तीसाठी ही हत्या करून मृतदेहाचे तीन भागात तुकडे करून हे तुकडे सुटकेसमध्ये टाकून तिन्ही सुटकेस मिठी नदीत फेकून दिल्या होत्या असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अटक मुलीने लैंगिक छळामुुुळे आणि दोघांंच्या प्रेमास विरोध असल्याने हत्या केल्याचे दोघांंनी कबुल केले. बेेनेट रिबेलो असं हत्या केलेल्या ६२ वर्षीय पुरुषाचे नाव आहे, अशी माहिती गुन्हे शाखा कक्ष - ५ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
माहीम येथील समुद्र किनारी सापडलेल्या सुटकेसमध्ये हात, पाय आणि गुप्तांग असे निरनिराळे अवयव पोलिसांना सापडले होते. तसेच त्यासोबत हत्ये करण्यात आलेल्या बेनेट रिबेलो यांचे कपडे पोलिसांनी घटनास्थळाहून हस्तगत केले होते. गुन्ह्याच्या उलगडा होण्यास कितीही अवघड असले तरी आरोपी पुरावे मागे सोडून जातोच. तसेच पोलिसांना मृताचे कपडे आढळून आले. याबाबत माहीम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कपडे हस्तगत केले आणि पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली. गुन्हे शाखा कक्ष - ५ च्या पोलिसांचे पथक प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांच्या मागदर्शनाखाली कामाला लागली. शरीराचे वेगवेगळे भाग, मृतदेह कोणाचा हे कळण्यास मार्ग नव्हता. तरीदेखील पोलिसांनी शिताफीने घटनास्थळाहून जप्त केलेल्या शर्टच्या आत कॉलरवर असलेल्या लेबलवरून अल्मो टेलरचा शोध घेतला.
कुर्ला पश्चिम येथील बेलग्रामी रोडवर अल्मो टेलरच्या दुकान पोलिसांना सापडले. त्यानुसार पोलिसांनी १०० ते १५०० बिल बुकं तपासली. बिलावर स्टेपल करण्यात येणाऱ्या कपड्याचा तुकडा अनेक बिलावरील कपड्याशी मिळताजुळता निघाला. त्यानुसार आम्ही प्रथम अयुब नावाच्या व्यक्तीकडे चौकशीसाठी गेलो. मात्र, त्याने माझे त्या कपड्याचे शर्ट घरीच असल्याचे दाखवले. त्यानंतर, पोलिसांनी अजून काही टेलरच्या बिलांचा तपास करताना एक बेनेट रिबेलो नावाच्या व्यक्तीचे बिल सापडले. त्या बिलावर लावलेला कपडा देखील घटनास्थळावर सापडलेले शर्टचा कपडा देखील मिळताजुळता होता. बेनेट यांनी आपली सही करून ते शर्ट नेले होते. त्याआधारे आम्ही बेनेटचा शोध घेत सांताक्रूझ पूर्वेकडील वाकोला मशिदीकडे बेनेटच्या राहत्या घरी पोचलो.
फेसबुकची भूमिका ठरली महत्वाची
या किचकट आणि आव्हानात्मक गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी टेलरच्या बिलांसोबतच फेसबुकची देखील भूमिका तपासात महत्वाची होती. टेलरच्या बिलावर बेनेट रिबेलो हे नाव समजताच आम्ही फेसबुकवर त्या नावाच्या व्यक्ती शोधल्या. त्यावेळी आम्ही अनेक बेनेट रिबेलो नावाच्या व्यक्तींचे प्रोफाईल तपासले. त्यावेळी एका प्रोफाईल फोटोत आम्हाला घटनास्थळी सापडलेल्या अर्ध बायांचे स्वेटर आढळून आले आणि तिथेच मृतांची ओळख पटली आणि तपासाला वेग आला असल्याची माहिती जगदीश साईल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
त्यावेळी बेनेट यांच्या घरी आराध्या पाटील ही १९ वर्षीय मुलगी पोलिसांनी भेटली. तिने बेनेट कॅनडाला गेले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आराध्याने अल्पवयीन प्रियकराच्या मदतीचे २७ नोव्हेंबरला पहाटे हत्या केल्याचे कबुल केले. पोलिसांनी आराध्या पप्पा माझ्या नावावर सगळी संपत्ती करणार होते असे वारंवार बोलत होती असल्याची माहिती जगदीश साईल यांनी दिली. बेनेट हे फन अँड म्युझिक इंटरप्राइसेसचे मालक होते असून ते मुंबई तसेच मुंबई बाहेरील पंचतारांकित हॉटेलमध्ये म्युझिक शो करणारे बेनेट हे घरी एकटेच राहत होते. याचाच फायदा घेऊन जवळच्याच झोपडपट्टीतील आराध्या या तरुणीने त्यांचा विश्वास संपादन करून एक ते दीड वर्षांपासून काही बेनेट यांच्या घरी आपल्या प्रियकरासोबत राहू लागली. मोठमोठे शौक असल्याने बेनेट यांच्या संपत्तीवर या दोघांचा डोळा होता. त्यामुळे कट रचून बेनेट यांची हत्या केली असल्याचा संशय जगदीश साईल यांनी व्यक्त केला.