पोलिसांच्या सतर्कतेमुळे पवईत ब्रिटिश नागरिकाचा वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:07 PM2019-07-04T17:07:25+5:302019-07-04T17:08:32+5:30
ब्रिटिश नागरिकाचे दिड तास मन परिवर्तन करून आत्महत्येपासून परावृत्त केले.
मुंबई - मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका ब्रिटिश नागरिकाचा जीव वाचला आहे. २७ जून रोजी सकाळच्या सुमारास पवई पोलिसांना मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून कॉल प्राप्त झाला की, पवई येथील हिरानंदानी परिसरातील टोरानो इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून ब्रिटिश नागरिक आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. याबाबत माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ब्रिटिश नागरिकाचे दिड तास मन परिवर्तन करून आत्महत्येपासून परावृत्त केले. या ब्रिटिश नागरिकाचे नाव सॅम कॉलर्ड (६१) असं आहे.
नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार पवई पोलीस तोरानो इमारतीजवळ पोचले असता पोलिसांनी तोरानो इमारतीशेजारी असलेल्या अवलॉन इमारतीच्या ३३ व्य मजल्यावर जाऊन सॅम यांचे स्थळ ट्रेस केले. मात्र, घर आतून लॉक होत असून खूप विनवण्या केल्यानंतर ब्रिटिश नागरिक असलेल्या सॅम यांनी दरवाजा उघडला. ते एकटेच राहत होते. त्यांना पॅरालिसिसचा झटका येऊन गेला होता. सॅम हे अमेरिकन कंपनीत काम करत असून त्याचे कार्यालय अंधेरी पूर्वेकडे आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियातील सिडनीत राहणाऱ्या आपल्या पत्नीस सॅमने आत्महत्या करणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यानंतर पत्नीने याबाबतची माहिती बीकेसी येथील ब्रिटिश डाय हाय कमिशन यांना दिली. त्यांनी ही माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास दिली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाने ही माहिती संबंधित पवई पोलिसांना दिली आणि ब्रिटिश नागरिकाचे प्राण वाचविले. ६१ वर्षीय सॅम अगोदर पवई पोलिसांवर भडकले होते. पोलिसांनी शांतपणे समजावून सांगितले आणि दिड तास समुपदेशन केल्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसून रुग्णालयात येण्यास तयार झाले. दरम्यान,पोलिसांनी त्यांना उपचारासाठी हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले.
मुंबई -पवईत ब्रिटिश नागरिकेने केला आत्महत्येचा प्रयत्न https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 4, 2019