पुलवामाचं 'ते' वक्तव्य भोवणार; राज ठाकरेंविरुद्ध पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 08:57 PM2019-03-11T20:57:59+5:302019-03-11T21:00:50+5:30
राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार एस. बालकृष्णन यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शनिवारी तेराव्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण करताना पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. मात्र हे वक्तव्य त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार एस. बालकृष्णन यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
एस. बालकृष्णन यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात राज ठाकरेंच्या मनसेच्या वर्धापन दिनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज ठाकरे हे एका पक्षाचे जबाबदार नेते आहेत. त्यांची वक्तव्ये ही गांभीर्यानं घेतली जातात असं असूनही त्यांनी मोदींविरोधात भाष्य करताना पुलवामासारखा एखादा हल्ला पुन्हा घडवला जाईल असं त्यांच्या भाषणात म्हटलं आहे. हे त्यांचं वक्तव्य बेजबाबदार असून याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असं एस.बालकृष्णन यांनी त्यांच्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.