शेतीच्या वादातून सावत्र भावानेच चिमुकल्याचा केला घात, मारहाण करून ट्रक चालकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 10:44 PM2023-03-23T22:44:16+5:302023-03-23T22:44:31+5:30
दोन खुनांनी जिल्हा हादरला
तीर्थपुरी, वडीगोद्री (जि. जालना) : शेतीच्या वादातून भारडी येथील सावत्र भावाने आठ वर्षांच्या लहान भावाचा खून केला तर दोदडगाव फाट्यावर ट्रक चालकाचा मारहाण करून खून करण्यात आला. भारडी येथील घटना गुरुवारी दुपारी तर दोदडगाव फाट्यावरील घटना बुधवारी रात्री घडली. या दोन्ही घटनांनी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
भारडी येथील घटनेत विराज तुकाराम कुढेकर (८) तर दोदडगाव फाट्यावरील घटनेत सीताराम अमरसिंग निंगवाल (४५, रा. कानपूर, जि. धार, कर्नाटक) यांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना भारडी येथील कुढेकर वस्तीवर घडली. येथील तुकाराम कुढेकर यांना दोन पत्नी आहेत. पहिली पत्नी छत्रपती संभाजीनगर येथे राहते. त्यांना ऋषिकेश कुढेकर (१८) हा मुलगा आहे तर दुसरी पत्नी कावेरी या तुकाराम कुढेकर यांच्यासोबत राहतात. त्यांना विराज कुढेकर व एक मुलगी आहे. पहिल्या पत्नीचा मुलगा ऋषिकेश हा छत्रपती संभाजीनगर येथे राहत होता. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून तो भारडी येथे राहण्यासाठी आला. गुरुवारी मयत विराज कुढेकर व ऋषिकेश हे दोघे उसाच्या शेतात गेले होते. यावेळी संशयित ऋषिकेशने गळा आवळून विराजचा खून केला. त्याच्या तोंडात, नाकात माती व चिखल घातलेला होता. ग्रामस्थांनी ही माहिती गोंदी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत चालक सीताराम अमरसिंग निंगवाल (४५, रा. कानपूर, जि. धार, कर्नाटक) हे क्लिनरसोबत कर्नाटकहून इंदौरकडे माल घेऊन निघाले होते. छत्रपती संभाजीनगर - बीड राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ अज्ञाताने त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून खून केला. नंतर मृतदेह ट्रकमध्ये ठेवला. आरोपी तेथून फरार झाला. कंपनीच्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी ट्रकचा शोध घेतला असता, ट्रॅकमध्ये सीताराम अमरसिंग निंगवाल यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आढळला. याची माहिती गोंदी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गोंदी पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डॉग स्कॉडसह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. क्लिनरचे लोकेशन इंदौर येथे असल्याने त्याला पकडण्यासाठी पाेलिस पथक रवाना झाल्याची माहिती सपोनि. सुभाष सानप यांनी दिली.