एसटी चालकाचे अपहरण करून लुटणाऱ्या दुकलीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 09:33 PM2019-11-05T21:33:57+5:302019-11-05T21:35:33+5:30
या दोघांना न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई - पोलीस असल्याचे सांगून अपहरण करून जबरीने पैसे काढून घेणाऱ्या टोळीस गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने केली अटक केली आहे. बाळू नाना पोटे (५७), सखाराम टेटकारे (३५) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. अलीकडेच या टोळीने घाटकोपर येथे एका एसटी चालकाचे अपहरण करून त्याला चाकूच्या धाक दाखवून लुटले होते. या दोघांना न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या एक एसटी चालक मोबाइलवर गेम खेळत होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्या चालकाची वाट अडवत हुज्जत घालण्यास सुरूवात केली. बोलता बोलता समोरील व्यक्तीने जवळच कारमध्ये बसलेल्या बाळू आणि सखाराम यांच्याजवळ चालकाला नेले. पोलीस असल्याचे सांगून दोघांनी चालकाला कारमध्ये जबरदस्ती बसवले. पोलीस ठाण्यात नेेतो सांगून तिघांनी चालकाला बेदम मारहाण केली. एकाने मोबाइल हिसकावून घेतला तर दुसऱ्याने गळ्यातील चैन हिसकावली. गाडीच्या काचेवर असल्यामुळे चालक कुणाकडे मदत ही मागू शकत नव्हता.
काही अंतरावर गेल्यावर आरोपींनी चालकाजवळून त्याचे एटीएम कार्ड देखील काढून घेत कार्डच्या पीन नंबरद्वारे त्याच्या खात्यावरील पैसे काढले. त्यानंतर अनोळखी ठिकाणी चालकाला सोडून दिले. या प्रकरणी घाटकोपर पोलिसात चालकाने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता. हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.