सुपारी कारखाना देण्याचे आमिष देवून नऊ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 09:17 PM2021-08-19T21:17:49+5:302021-08-19T21:18:19+5:30
Fraud Case : एमआयडीसी कार्यालयातून प्रक्रिया करावी लागते, असे म्हणत वेळ मारुन नेली. मनोज सातत्याने प्रशांतकडे चकरा मारत होता.
यवतमाळ : येथील एका व्यापाऱ्याला एमआयडीसीतील सुपारी फोडण्याचा कारखाना विक्री करायचा आहे, असे सांगून ८ लाख ९७ हजारांचा गंडा घालण्यात आला. रोख घेवून आरोपी यवतमाळातून पसार झाला आहे.
मनोज गुरुमुखदास छाबडा (४७) रा. वैद्यनगर सिंधी कॅम्प यवतमाळ या व्यापाऱ्याचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते. त्यांच्या दुकानात प्रशांत किसन खोडके (३६) रा. सुभाषनगर हा नेहमी येत होता. मोबाईल दुकान व्यवस्थित चालत नसल्याची खंत मनोजने बोलून दाखविली. यावर प्रशांतने त्याला तु सुपारी फोडण्याचा कारखाना का सुरू करत नाही, असा सल्ला दिला. माझ्याकडे सुपारी फोडण्याचा कारखाना आहे. तो विकायचा आहे, असे सांगितले. मनोजनेही सुपारी फोडण्याचा कारखाना विकत घेण्यासाठी प्रशांत खोडके याला आठ लाख ९७ हजाराची रोख दिली. मात्र त्यानंतर आरोपी प्रशांत खोडके याने कारखाना नावावर करून देण्यास टाळाटाळ सुरू केली.
एमआयडीसी कार्यालयातून प्रक्रिया करावी लागते, असे म्हणत वेळ मारुन नेली. मनोज सातत्याने प्रशांतकडे चकरा मारत होता. प्रत्येक वेळी त्याला नवीन उत्तर मिळत होते. याच प्रमाणे प्रशांत खोडके याने अनेकांना गंडा घातल्याचे मनोजला माहीत झाले. मनोज हा प्रशांतच्या घरी पोहोचला असता त्याच्या घराला कुलूप लागलेले दिसले. तो यवतमाळ शहरातून पसार झाला. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मनोजने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.