थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर बनावट मद्यविक्री करणाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 09:10 PM2019-12-24T21:10:45+5:302019-12-24T21:16:31+5:30
११ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त
मुंबई - खारदांडा येथे बनावट मद्याची वाहतूक व विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करुन त्याच्याकडून ११ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक २ ने ही कारवाई केली. खार पश्चिम येथील साईबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर अनधिकृतपणे मद्याची वाहतूक केली जात असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कांदिवली येथील महाराष्ट्र नगरमधील एका घरात छापा टाकण्यात आला त्यावेळी बनावट विदेशी मद्याच्या १ लिटरच्या ८५ बाटल्या, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात अर्जन बेचरा भरवाड या आरोपीला मुंबई दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ अ, ब, क,ड, ई व कलम ८१, ८३, १०८ नुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण, मुंबई उपनगर जिल्हा अधिक्षक स्नेहलता श्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक २ चे निरीक्षक जनार्दन खिल्लारे यांनी व भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक मनोज चौधरी यांनी त्यांच्या दुय्यम निरीक्षक व जवानांसोबत ही कारवाई केली.
ड्युटी फ्री विदेशी मद्य कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कमी किंमतीत विदेशी मद्य उपलब्ध होत असल्याने ते खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा ओढा असतो त्याचा गैरफायदा घेऊन असे प्रकार केले जात आहेत. या प्रकरणाचा तपास निरीक्षक जनार्दन खिल्लारे करत आहेत.