लॉकडाऊनदरम्यान उपअभियंता एक लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:30 PM2020-04-01T22:30:23+5:302020-04-01T22:32:17+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यप्रणाली अवलंबिली आहे.
औरंगाबाद : हर्सूल कारागृहात केलेल्या बांधकामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता श्रीराम बाबूराव बिरारे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यापोलिसांनी मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यप्रणाली अवलंबिली आहे. अशा परिस्थितीतही उपअभियंता बिरारेला लाच घेण्याचा मोह आवरला नाही.
हर्सूल मध्यवर्ती कारागृहात सदरील ठेकेदाराने ७० टक्के काम पूर्ण केले आहे. शिवाय या ठेकेदाराने महिला कारागृहाचे नवीन बांधकाम केले असून, कारागृहातील मुलाखत खोलीच्या दुरुस्तीचे कामही केले आहे. या कामांचे बिल मंजूर करण्याचे अधिकार सा. बां. कार्यालयातील पश्चिम विभागाचे उपअभियंता श्रीराम बिरारे (५१, रा. मनीषा कॉलनी, जिल्हा न्यायालयामागे) याच्याकडे आहेत. प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी बिरारे याने ठेकेदाराकडे १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. यापैकी बिरारे हा आज मंगळवारी १ लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाला व उर्वरित २५ हजार रुपये बिले निघाल्यानंतर घेण्याचे ठरले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचारी विजय बाह्मंदे, संतोष जोशी, सुनील पाटील, विलास चव्हाण, चालक चांगदेव बागूल यांनी परिश्रम घेतले.
ठेकेदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याकडे केली. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपाधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उन्मेष थिटे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी बिरारेच्या निवासस्थानी सापळा रचला. त्यावेळी या ठेकेदाराने ठरल्यानुसार बिरारे यास पैसे देताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी बिरारे यास १ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले.