लॉकडाऊनदरम्यान विकले जात होते अमली पदार्थ, पोलिसांनी कारवाई करत केली एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 07:28 PM2020-04-02T19:28:13+5:302020-04-02T19:33:36+5:30
तुर्भे एमआयडीसी परिसरात केली कारवाई
नवी मुंबई - लॉकडाऊनच्या कालावधीतही तुर्भे एमआयडीसी परिसरात अमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून गांजा, चरस व विदेशी दारू असा 2 लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तुर्भे एमआयडीसीमधील आंबेडकर नगर परिसरात हि कारवाई करण्यात आली आहे. त्याठिकाणी अमली पदार्थ व दारू विकली जात असल्याची माहिती विशेष पथकाचे सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली देवडे यांच्या पथकाने सापळा रचला होता.
यावेळी तुर्भे नका येथे दोघेजण संशयास्पद वावरताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाने पळ काढला. दरम्यान शरीफ गाणी शेख हा पोलिसांच्या हाती लागला असता पळालेली व्यक्ती त्याचे वडील असल्याचे समोर आले. दोघे मिळून परिसरात अमली पदार्थ विक्री करायचे. यानुसार अंग झडती मध्ये त्याच्याकडे गांजा मिळून आला. तसेच त्याच्या घराच्या झडतीमध्ये 742 ग्राम गांजा, 78 ग्राम चरस व विदेशी दारू असा एकूण 2 लाख 66 हजार 288 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी पिता पुत्राविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गणी शेख याचा पोलीस शोध घेत आहेत.