लॉकडाऊनमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे, 1.21 कोटींचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:26 PM2020-04-11T18:26:28+5:302020-04-11T18:32:02+5:30
लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत 1 कोटी 21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई - देशात कोरोना व्हायरसने हातपाय पसरले असून याला आळा घालण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, लॉकडाऊनचे नियम उल्लंघन करून राज्यभरात आतापर्यंत पोलिसांनी केलेली दंडात्मक कारवाई कोटींच्या घरात पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत 1 कोटी 21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबईत लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीही कार्यालये, दुकाने आदी चालविण्यास मनाई होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा किराणा दुकान आणि अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या लॉकडाऊनमध्ये समूहाने एकत्र येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. नागरिकांनी एकत्रित बाहेर पडून संसर्गाची भीती वाढू नये म्हणूनच राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. पण त्यानंतरही विनाकारण गाड्या फिरवणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई आता एक कोटींच्या पार पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत एक कोटी 21 लाख 99 हजार 44 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल आहे. याशिवाय 18 हजार 995 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात भा. दं. सं कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाते. त्यानुसार पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवून कायदे मोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात आतापर्यंत कलम 188 अंतर्गत 34 हजार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. राज्यात आणि मुंबईत करोना हळूहळू हातपाय पसरू लागलेला असताना करोना आणि त्या संदर्भात सरकारकडून केल्या जाणाऱया उपाययोजनांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर अफवांना उधाण आले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व सायबर पोलीस सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेऊन असून राज्यातील 161गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील सायबर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहे. याशिवाय पोलिासंवर हल्ला झाल्याप्रकरणी 69 गुन्हे राज्यभरात दाखल करण्यात आले आहेत.