कार तपासणीदरम्यान पोलीस झाले अवाक् सापडलं कोटींचं घबाड, तीन तरुण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 01:25 PM2022-03-07T13:25:31+5:302022-03-07T13:26:33+5:30
Crore of notes Seized : जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत.
बिहारच्या गोपालगंजमध्ये एका कारमधून करोडोंची रोकड जप्त करण्यात आली आहे. फुलवारिया पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी श्रीपूरजवळ वाहन तपासणीदरम्यान कारमधून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी कारमधील तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हथुआ एसडीपीओ नरेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली कारमधून जप्त करण्यात आलेल्या नोटांची मोजणी केली असता त्या 1 कोटी 48 लाख 99 हजार 500 रुपयांच्या निघाल्या. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत.
एसडीपीओ नरेश कुमार यांनी सांगितले की, फुलवारिया पोलिस स्टेशन हद्दीतील श्रीपूरजवळ पोलिस वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान उत्तर प्रदेशकडून येणारी एक कार थांबवून तिची तपासणी केली असता कारच्या ट्रंकमधून घबाड सापडले. जप्त केलेली रक्कम पोलिस ठाण्यात आणण्यात आली आणि तेथे नोट मोजण्याचे यंत्र मागवून त्याची मोजणी करण्यात आली. पुढे ते म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते ही रक्कम यूपीतील खलीलाबाद येथून छप्रा येथे घेऊन जात होते. एका तरुणाने हे पैसे व्यावसायिकाशी संबंधित असल्याचे सांगितले, त्यानंतर आयकर विभागाच्या टीमला पाचारण करण्यात आले.
तिन्ही तरुण दिशाभूल करत आहेत
एसडीपीओ म्हणाले की, तपासानंतर सोमवारी या प्रकरणाचा खुलासा केला जाईल. मात्र, गाडीतून नोटांचे बंडल सापडल्यानंतर परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा यूपीमधील विधानसभा निवडणूक, हवाला व्यवसाय आणि सायबर क्राईमशी संबंध जोडून तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान हे तिघे तरुण जप्त केलेल्या रकमेबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगून दिशाभूल करत आहेत. कोलकाता येथील अंकित साव, जलालपूर येथील पृथ्वी कुमार आणि छपरा येथील मसरख येथील अनूप कुमार तिवारी अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.