पुनीत इसर यांचा ई-मेल आयडी हॅक, पैसे लुबाडण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 08:15 AM2022-11-27T08:15:00+5:302022-11-27T08:15:42+5:30
थिएटर बुकिंगचे पैसे लुबाडण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चित्रपट अभिनेते पुनीत इसर (६४) यांचा ई-मेल आयडी हॅक करत त्यांचे थिएटर बुकिंग रद्द करत त्यांचे १३ लाख रुपये लाटण्याचा
प्रयत्न एका भामट्याने केला. मात्र, त्यांनी याप्रकरणी वेळीच ओशिवरा पोलिसांत तक्रार दाखल केली आणि भामट्याचा हा प्रयत्न फसला. पोलिसांनी त्याला मालाडमधून बेड्या ठोकण्यात यश मिळवले.
पुनीत हे अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अमित इस्टेट थर्ड क्रॉस रोड येथे राहतात. त्यांची शो मॅन थिएटर प्रोडक्शन नावाची कंपनी असून, या कंपनीचा व्यवहार ई-मेलमार्फत केला जातो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनीत यांनी त्यांच्या कंपनीच्या ई-मेल आयडीवरून त्यांचे हिंदी नाटक जय श्रीराम या नाटकाचा प्रयोग करण्याकरिता एनसीपीए थिएटर यांना १४ आणि १५ जानेवारी २०२३ रोजीचा प्रयोग बुक केला.
तसेच यासाठी त्यांनी १३ लाख ७६ हजार ४०० रुपयेदेखील दिले. दरम्यान, २२ नोव्हेंबर २०२२ रोजी एनसीपीए थिएटरला मेल करण्यासाठी त्यांनी त्यांचा ई-मेल आयडी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ओपन झाला नाही. तेव्हा ई-मेल आयडी हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार केली. तेव्हा पुनीत यांनी प्रयोगासाठी पैसे दिल्याचे त्यांना समजले. त्यानुसार एनसीपीए थिएटरच्या प्रतिनिधीशी संपर्क केला. बँक खात्यावरून पाेलिसांनी आरोपीचे लोकेशन मिळवले.