बनावट आयडीच्या आधारे ई-तिकीट घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 07:25 PM2018-11-12T19:25:53+5:302018-11-12T19:26:15+5:30
सदर दोघे बनावट आयडीच्या आधारे सायबर कॅफेच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध गाडयांचे ई-तिकिट काढत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली येथील एका सायबर कॅफेवर नजर ठेवली होती.
पुणे : बनावट ईमेल आयडीच्या आधारे रेल्वेच्या संगणक प्रणाली (ई-तिकिट)द्वारे रेल्वेच्या विविध ठिकाणी धावणा-या एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षित तिकिट काढून घोटाळा करणा-या सांगली येथील दोघांना रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पथकाने अटक केली आहे.
मंजित बाबासाहेब पाटील (वय ३७, रा. सांगली), गजानन काडप्पा गोंधळी (वय २९, रा. हरिपुर, ता.मिरज, सांगली) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सदर दोघे बनावट आयडीच्या आधारे सायबर कॅफेच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध गाडयांचे ई-तिकिट काढत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली येथील एका सायबर कॅफेवर नजर ठेवली होती. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास दोघेही संबंधिक कॅफेमध्ये आले व तिकीटांचे प्रिंट घेत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून पुढील तारखेचे दहा तिकिट व मागील ५० असे एकूण ६२ हजार रुपयांची ६० तिकिट जप्त केले आहेत. तसेच दोन संगणक, दोन मॉनिटर, दोन मोबाइल त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आले आहे. बनावट आयडीद्वारे ते काही सेंकदाच्या आत रेल्वेचे आरक्षण सुरू झाल्यावर काढत असल्याचे दिसून आले आहे. रजिस्टर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून आरोपींनी कशाप्रकारे बनावट आयडीद्वारे तिकिटे काढली व त्यांचे आणखी अन्य साथीदार आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहे. आरोपींकडे अजून काही बनावट ईमेल आयडी मिळून येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्यादृष्टीने अधिक तपास आरोपींकडे करावयाचा आहे. सोमवारी त्यांना रेल्वेच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी सरकारी वकील वामन कोळी यांनी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.