बांधकाम उद्योगातील कंपनीवर ईडीची कारवाई, १३०० कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 06:17 AM2022-10-18T06:17:34+5:302022-10-18T06:17:55+5:30
जप्त झालेल्या या मालमत्तेमध्ये भूखंड, व्यावसायिक जागा, घरे आणि बँक खात्यातील रक्कम आदींचा समावेश आहे.
मुंबई : घर आणि व्यावसायिक गाळ्यांच्या बांधकामाचे आश्वासन देत सामान्य ग्राहकांकडून पैसे घेत त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि देशातील प्रमुख शहरांत बांधकाम उद्योगात कार्यरत असलेल्या आयरो समूहाची तब्बल १३१७ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. जप्त झालेल्या या मालमत्तेमध्ये भूखंड, व्यावसायिक जागा, घरे आणि बँक खात्यातील रक्कम आदींचा समावेश आहे. शाओमी कंपनीवर ईडीने तीन महिन्यांपूर्वी जप्तीची कारवाई करत कंपनीची ५५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ईडीने केलेली ही जप्तीची दुसरी कारवाई आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीसह देशातील अन्य काही प्रमुख शहरांत ललित गोएल यांची आयरो कंपनी बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र, दिल्ली आणि उत्तर भारतातील काही प्रमुख शहरांतून नवे बांधकाम प्रकल्प कंपनीने सादर केले. या माध्यमातून ग्राहकांना घर, तसेच व्यावसायिक गाळे देण्याचे आश्वासन कंपनीने दिले. मात्र, प्रत्यक्षात या प्रकल्पाकरिता ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करूनही कंपनीने त्या ग्राहकांना घरे अथवा व्यावसायिक गाळे दिले नाहीत. तसेच, या ग्राहकांना पैसेही दिले नाहीत.
कंपनीच्या संचालकांनी या पैशांचा अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर दिल्ली, गुरगाव, पंचकुला, लुधियाना आदी शहरांतून कंपनीच्या विरोधात तब्बल ३० एफआयआर दाखल झाल्या. या आर्थिक गैरव्यवहारांची व्याप्ती लक्षात घेता हा तपास ईडीने देखील सुरू केला होता. तसेच, कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष असलेल्या ललित गोएल याला १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याच्या चौकशी दरम्यान जसजशी माहिती मिळत गेली त्या अनुषंगाने ईडीने आता कारवाई सुरू केली असून, गेल्या शनिवारी कंपनीची १३१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
ग्राहकांचा पैसा वापरला परदेशातील व्यवहारांसाठी
ईडीमधून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य ग्राहकांकडून कंपनीने जो कोट्यवधींचा निधी गोळा केला, त्या पैशांचा वापर प्रकल्पाचे काम करण्यासाठी न करता परदेशातील व्यवहारांकरिता केला. तसेच, काही लोकांना कर्ज रुपाने देखील हे पैसे दिले. तर कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याच्या रुपाने मोठ्या प्रमाणावर पैसे देण्यात आल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.