पेटीएम, कॅश फ्री कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबई, पुण्यासह देशात १६ ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 06:19 AM2022-09-17T06:19:29+5:302022-09-17T06:19:47+5:30
गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल ॲपवरून देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढले होते. तसेच सर्वसामान्य ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत होती.
मुंबई : मोबाईल ॲपच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्यांवरील कारवाई ईडीने तीव्र करत मुंबई, पुण्यासह देशभरात १६ ठिकाणी छापेमारी केली. त्यात पेटीएम, कॅश फ्री, ईझ बझ या आणि अन्य काही प्रमुख पेमेंट गेट वे कंपन्यांची एकूण ४६ कोटी ६७ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल ॲपवरून देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढले होते. तसेच सर्वसामान्य ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत होती. त्यामुळे ईडीने या ॲप कंपन्यांचा तपास हाती घेतला. त्यानंतर त्यांचे मूळ मालक चीनचे नागरिक असल्याची माहिती पुढे आली होती. त्यात झालेल्या अवैध व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई तीव्र केली आहे. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरुसह देशात १६ ठिकाणी छापेमारी केली. पेमेंट गेट, क्रिप्टो करन्सी आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या कंपन्यांवर प्रामुख्याने छापेमारी झाली. या विविध कंपन्यांच्या कार्यालयांतून रोख रक्कम जप्त केली.
सर्वाधिक रक्कम पुण्यातून जप्त
ईझ बझ कंपनीच्या पुणे कार्यालयातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्वाधिक म्हणजे ३३ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. तर रेजरपे कंपनीच्या बंगळुरु कार्यालयातून १ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. कॅश फ्री कंपनीच्या बंगळुरु कार्यालयातून १ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम जप्ती करण्यात आली तर पेटीएम कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयातून १ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या जप्तीमध्ये रोख रकमेसोबतच काही पैसा हा क्रिप्टो करन्सीत गुंतविल्याचे दिसून आले, तो पैसाही ईडीने जप्त केला आहे.
पेटीएम कंपनीकडून छाप्याचे खंडन
छाप्याच्या वृत्ताचे पेटीएम कंपनीने खंडन केले असून काही विशिष्ट मर्चंटसोबतच्या व्यवहारांची बँक खाती गोठविण्याचे निर्देश आम्हाला ईडीने दिल्याची प्रतिक्रिया पेटीएमने ट्विटरद्वारे दिली आहे. या पैशांशी पेटीएमचा कोणताही संबंध नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.