ईडीची कारवाई! दाऊद इब्राहिमच्या ब्रिटनमधील मालमत्तेचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 09:54 PM2019-10-12T21:54:10+5:302019-10-12T21:57:40+5:30
बिंद्रा, युसूफच्या चौकशीतून महत्वपूर्ण माहिती
मुंबई - गेल्या अडीच दशकापासून फरारी असलेल्या दाऊद इब्राहिमच्या देशभरात विविध ठिकाणी व ब्रिटनमध्ये असलेल्या बेनामी मालमत्तबाबत सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) महत्वपूर्ण महिती हाती लागली आहे. दिवगंत गँगस्टर इकबाल मिर्चीच्या अटक केलेल्या 2 दलालांकडील चौकशीतून हा उलगडा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मिर्चीच्या मुंबईतील कोट्यावधीच्या मालमत्तेच्या विक्रीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने दिल्लीतून रणजित सिंग बिंद्रा व हारुण अलीम युसूफ यांना शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करुन मालमत्तेच्या जप्तीची कारवाई केली जाईल, असे ईडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरारी असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले होते. त्याने १९८६मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यातर्गंत दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये दोघेजण चौकशीसाठी हजर होत नव्हते. त्यांना दिल्लीतून अटक केल्यानंतर चौकशी केली असता दाऊदच्या देशात व ब्रिटनमध्ये असलेल्या मालमत्तेची माहिती मिळाली, त्याबाबत आतापर्यत सरकारकडे काहीही माहिती नव्हती, त्यामुळे दोघांकडून मिळालेल्या माहितीची छाननी करण्याचे काम सुरु आहे. त्याची पडताळणी झाल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.