कुख्यात गुंड इकबाल मिर्चीच्या दोन साथीदारांना ईडीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 10:02 PM2019-10-11T22:02:20+5:302019-10-11T22:04:23+5:30
२०० कोटी जमीन खरेदी प्रकरण; दिल्लीत कारवाई
मुंबई - मुंबईतील एका जमीन खरेदी घोटळ्याप्रकरणातील दिवगंत कुख्यात गुंड मोहम्मद इकबाल मेमन उर्फ इकबाल मिर्चीच्या दोघा फरारी साथीदारांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिल्लीत अटक केली. हारुण अलीम युसुफ व रणजितसिंग बिंद्रा अशी त्यांची नावे असून त्यांना पाच दिवसाची कोठडी मिळाली आहे. ३३ वर्षांपूर्वीच्या या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील आणखी दोन मोठ्या बिल्डरांची नावे पुढे आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
इकबाल मिर्ची हा अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय होता.फरारी असताना त्याचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने मुंबईत वरळी व परिसरातील खरेदी केलेल्या भुखंड प्रकरणात २०० कोटीचा घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ईडीकडून याप्रकरणी मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यातर्गंत (पीएमएलए) गुन्हा दाखल करुन तपास करण्यात येत आहे.
दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीने सप्टेंबर १९८६ मध्ये याने रॉकसाईड एंटरप्रायझेस कंपनीच्या मार्फत मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत खरेदी केलेली होती. वरळी परिसरातील सी व्ह्यू, मरिअम लॉज आणि राबिया मॅन्शन या १५३७ चौरस मीटर लांबीच्या या मालमत्ता आहेत. परदेशात फरारी झालेल्या मिर्चीच्या या मिळकती मध्यस्थाच्यामार्फत विकण्यात आलेल्या असून त्याची किंमत २०० कोटीहून अधिक आहे. त्यामध्ये युसूफ व सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने रणजिंत सिंग बिंद्राने महत्वाची भूमिका पार पाडली होती.या व्यवहारातून त्यांनी ३० कोटीची दलाली मिळविल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यामुळे या दोघांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविली होती. मात्र ते फरारी झाले होते, दिल्लीतील एका हॉटेलात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांना अटक करुन मुंबईत आणले. दुपारी मुंबईतील न्यायालयात हजर केले असता ५ दिवसाची कोठडी मिळाली. या व्यवहारात मुंबईतील काही बिल्डरांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नवी दिल्ली - २०० कोटीच्या जमीन व्यवहार प्रकरणी ईडीने कुख्यात गुंड इकबाल मिर्चीशी संबंधित दोघांना केली अटक https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) October 11, 2019