चिनी कंपनी Vivo मोबाईलवर ED ची मोठी कारवाई; कंपनीच्या ४ अधिकाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 16:18 IST2023-10-10T16:17:17+5:302023-10-10T16:18:15+5:30
अटक केलेल्या ४ जणांमध्ये LAVA इंटरनॅशनलच्या व्यवस्थापकीय संचालकांचाही समावेश

चिनी कंपनी Vivo मोबाईलवर ED ची मोठी कारवाई; कंपनीच्या ४ अधिकाऱ्यांना अटक
ED raids Vivo, Lava: सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) चिनी मोबाईल कंपनी विवो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने एका चिनी नागरिकासह 4 जणांना अटक केली आहे, त्यापैकी एक व्यक्ती लावा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे सांगितले जात आहे. लावा ही भारतीय मोबाईल कंपनी आहे. या सर्व लोकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने अटक केलेल्यांमध्ये चिनी नागरिक अँड्र्यू कुआंग, लावा इंटरनॅशनलचे एमडी हरी ओम राय आणि चार्टर्ड अकाउंटंट राजन मलिक आणि नितीन गर्ग यांना अटक करण्यात आली आहे. ईडीची ही कारवाई विवो मोबाईलवर वर्षभरापूर्वी झालेल्या छापेमारीनंतर करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ईडीने देशभरात विवो मोबाईलच्या ४८ ठिकाणांचा शोध घेतला होता. या कालावधीत विवो मोबाईल्सशी संबंधित 23 कंपन्यांचीही चौकशी करण्यात आली. ED च्या मते, Vivo Mobiles India Private Limited ची स्थापना 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली. याच्याशी संबंधित एक कंपनी असलेल्या, ग्रँड प्रॉस्पेक्ट इंटरनॅशनल कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, याला GPICPL असेही म्हणतात. या कंपनीच्या स्थापनेत नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, त्यासंबंधीचे मनी लाँड्रिंगचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीने ही मोठी कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.