500 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी जीएसटीचे अतिरिक्त संचालक सचिन सावंत यांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:43 AM2023-06-28T10:43:31+5:302023-06-28T10:51:26+5:30
सचिन सावंत यांनी ईडी मुंबईच्या झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम केले होते.
मुंबई : ईडीने सीमाशुल्क आणि जीएसटीचे अतिरिक्त संचालक सचिन सावंत यांना बुधवारी 500 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. दरम्यान, काल, मंगळवारी ईडीने सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर आज त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
सचिन सावंत यांनी ईडी मुंबईच्या झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम केले होते. हिरे व्यापारी, व्यवसायिक यांच्याकडून 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बेकायदेशीरपणे वळवणे आणि हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने सचिन सावंत यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. या तक्रारीमुळे सीबीआयने सचिन सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यानंतर मंगळवारी ईडीने सचिन सावंत यांच्या निवासस्थानासह मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकले. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. तसेच, सचिन सावंत यांच्या नातेवाईकांच्या घरावरही मंगळवारच्या रात्री ईडीने छापा टाकला होता.